Breaking News

निवृत्त पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना टाकले वाळीत

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष

नागोठणे : प्रतिनिधी

माझ्या कुटुंबाला ग्रामस्थ उंबरवाडी पंच कमिटी यांनी वाळीत टाकले असून, त्याची चौकशी करून योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी हशा नामा हंबीर यांनी रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली असून त्याची प्रत रोहे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पाली पोलीस ठाणे यांना पाठवली आहे. येथील निवृत्त पोलीस कर्मचारी हशा नामा हंबीर निवृत्तीनंतर सुधागड तालुक्यातील उंबरवाडी या आदिवासीवाडीत आपल्या मूळ गावी कुटुंबीयांसह राहावयास गेले आहेत. दीड वर्षापासून म्हणजेच 28 मार्च 2018 पासून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गावपातळीवरील पंचांनी कोणतीही बोलीभाषा, पाणी, अग्नीमदत, कामधंद्यात मदत करू नये तसेच माझ्या सुख-दुःखात कधीही सहभागी होऊ नये, असा ठराव केल्याने गावातील कोणतीही व्यक्ती माझ्या कुटुंबाशी बोलत नसल्याचे हंबीर यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले आहे. या निवेदनात हंबीर यांनी उंबरवाडीतील 13 पंचांच्या नावाचासुद्धा स्पष्ट उल्लेख केला आहे. यापूर्वी माझ्याकडील धार्मिक कार्यक्रमाला उंबरवाडीतील सर्व ग्रामस्थ न चुकता उपस्थित राहत असत, मात्र दीड वर्षापासून कुटुंब व भावकी सोडली तर पंचांच्या सांगण्यावरून इतर ग्रामस्थ माझ्या सुख-दुःखाच्या कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. गाव पंचांनी त्यांच्यावर दबाव टाकल्यामुळेच हा प्रकार होत असल्याचे हंबीर यांचे म्हणणे आहे. 29 ऑक्टोबर रोजी आपल्याला जीवे मारण्याचीसुद्धा धमकी दिली असल्याचे हंबीर यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्याला वाळीत टाकल्याबाबतचा गुन्हा संबंधितांवर दाखल करावा, अशी मागणी हशा हंबीर यांनी केली आहे. दरम्यान, आदिवासी समाजातील कुटुंबाला वाळीत टाकण्याची घटना रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच घडत असून पोलीस अधीक्षकांची पुढील कार्यवाही काय असू शकेल याकडे हंबीर कुटुंबाचे लक्ष लागले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply