Tuesday , March 21 2023
Breaking News

‘नवोदितांनी लेखनाशी प्रामाणिक राहावे’

चंद्रपूरचे इरफान शेख एक युवा कवी. त्यांची कविता गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या व तडफेने साहित्य सेवा करणार्‍या या युवा कवीशी संवाद साधला आहे ‘रामप्रहर’च्या संदीप बोडके यांनी…

प्रश्न : बालपण, भावंडे, कौंटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण, नोकरी याविषयी थोडक्यात सांगा.

उत्तर : आम्ही चार भावंडे, दोन भाऊ आणि दोन बहिणी. अतिशय गरीब परिस्थितीतून आमच्या आईने मेहनत करून आमचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. माझा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या राजूर या गावातला. कोळशाची खाण असल्याने अनेक कुटुंबं तिथे मजुरीसाठी स्थिरावलेले. वडिलांना दारू पिण्याची सवय आणि या सवयीमुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची. आजी आईला जाच करायची. ते असह्य होऊन माझ्या आजोबांनी म्हणजे आईच्या वडिलांनी तिला चंद्रपुरात आणलं. मग आईने बाबांना बोलावून घेतलं. गरिबी इतकी होती की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वरती छप्पर म्हणून काही नसताना पाणी आत पडायचं आणि आम्ही सर्व जण त्यात भिजत झोपायचो. कित्येकदा मला व माझ्या मोठ्या बहिणीला घेऊन आई एखाद्या पानठेल्याच्या छपरात रात्र काढायची. पुष्कळदा शाळेत जात असताना काही खाल्ले नसताना उपाशी शाळेत जात असू. माझी मोठी बहीण आणि मी कित्येकदा रस्त्यावर पडलेल्या केळीची सालं उचलून धुऊन खाल्लेली आहेत. चंद्रपुरात एक महाकाली देवीचे मंदिर आहे. मी आणि माझी बहीण शाळेत जाताना दोघेही मंदिरात जाऊन प्रसाद खायचो. मी आठव्या वर्गात गेलो आणि शाळा सोडली. भावाच्या ठेल्यावर जाऊन बसायचो. तेथे पत्रकार सुरेश धोपटे यायचे. ते चंद्रपूर पत्रिका नावाचे साप्ताहिक चालवायचे. त्यांनी माझी शाळेत जाण्याची व्यवस्था केली. माझी शाळेत जाण्याची इच्छा नव्हती, पण त्यांना टाळता येत नसल्याने मी जाऊ लागलो. दहावीला प्रथम श्रेणीमध्ये पास झाल्यानंतर परिस्थितीमुळे त्या वेळेस कला शाखेत प्रवेश घेतला आणि अकरावी-बारावी केली. आता आम्ही शिकवू शकत नाही असे घरच्यांनी सांगितलं आणि मी मदत मागायला वसंतभाई सूचक यांच्याकडे गेलो. वसंतभाईंनी माझा तीन वर्षांच्या अभ्यासाचा खर्च उचलला. मी पदवीधर झालो. या दरम्यान एकच गोष्ट आश्वासक होती की मी कविता लिहायला लागलो. त्याच वेळी जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचा माझा परिचय झाला. भारताचे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे साहित्यरसिक होते. त्यांच्याशी संपर्क आला. मनोहर सप्रे यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात बोलताना मनोहर सप्रे शांतारामजींना म्हणाले की, ज्यांच्याकडे शैक्षणिक संस्था आहे त्यांनी कलावंतांची मदत केली पाहिजे. पोटदुखे सरांना ती कल्पना आवडली. त्यांनी मला दुसर्‍या दिवशी कॉलेजला बोलावलं आणि अंशकालीन कर्मचारी म्हणून कॉलेजमध्ये नियुक्ती केली. मी चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात कामाला लागलो.

प्रश्न : आपण कविता लेखनाकडे कसे वळलात?

उत्तर : जेव्हा मी दहाव्या वर्गात होतो त्याच दरम्यान मी होजियरी ठेल्यावरती भावासोबत बसत होतो. त्यावेळेस सुरेश धोपटे आमच्या ठेल्यावर येऊन बसायचे. एक दिवस ते मला म्हणाले की, आपला 26 जानेवारीला अंक निघतो आहे. त्यासाठी एखादा लेख लिहून दे. मी आजचा विद्यार्थी आणि त्याची स्थिती यावर एक छोटासा लेख लिहिला. लेख खूप चांगला झाला. मग एकदा पुन्हा ते म्हणले की, एखादी कविता लिहून दे. म्हटलं, चला कविताही करून पाहू. कारण शाळेमध्ये शिकत असताना अनेक कविता तोंडपाठ झालेल्या होत्या. कविता लिहून त्यांना दाखवली. ती आईवरची कविता होती. कविता त्यांनी त्यांच्या अंकात पाठवून दिली. कविता लिहिल्यावर मला असे वाटले की लेख वगैरे देण्यापेक्षा आणि वैचारिक लेखन वगैरे करण्यापेक्षा कविता करणे फार सोपे आहे आणि त्याचमुळे आपण कविताच करावी. मी अशा पद्धतीने कविता करायला लागलो, पण खरं म्हणजे आज कळतं की कविता लिहिणं सोपं नाही. कवितेची ताकद नंतर मला कळली.

प्रश्न : आपण आईवर पहिली कविता लिहिली. ती लिहून झाल्यावर आपल्याला कसे वाटले होते?

उत्तर : माझी पहिली कविता आई या शीर्षकाची होती. कोणताही कवी आईवरच आधी कविता लिहील, असे मला वाटते. कारण ती त्याची दैवत असते. मीही लिहिली आणि ती कविता चंद्रपूरच्या एका दैनिकात प्रकाशित झाल्यानंतर मला असे वाटले की आपण जगातली सर्वोत्तम कविता लिहिली. कारण माझी पहिलीच कविता मला खूप आवडली. त्यानंतर आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातून निघणार्‍या महाविदर्भ या दैनिकामध्येही माझी ती कविता प्रकाशित झाली

प्रश्न : आपले पहिले 3 कवितासंग्रह 2003/4/5 साली प्रकाशित झाले. 4था ‘माझ्यातला कवी मरत चाललाय’ हा संग्रह प्रकाशित व्हायला मात्र बराच काळ जावा लागला. यामागचे कारण काय?

उत्तर : दहावीला असल्यापासून मी कविता करायला सुरुवात केली. माझ्या कविता चंद्रपुरातील साप्ताहिकात प्रकाशित होऊ लागल्या. 2001 मध्ये दहावी झाल्यानंतर मी चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे मला मराठी शिकवायला सरिता जांभुळे होत्या. त्या स्वतः उत्तम कवयित्री होत्या. मॅडमला मी जेव्हा म्हटलं की मीदेखील कविता करतो आणि माझ्या 40-50 कविता लिहून झाल्या आहेत. तेव्हा त्यांनी पुस्तक काढण्याची कल्पना मांडली. सुरेश धोपटे आणि माझ्या शाळेतील शिक्षिका बिता रामटेके प्रकाशक म्हणून मदतीला आले आणि या तिघांच्या सहकार्याने 2002 मध्ये माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. त्यानंतर 2003 मध्ये माझे ‘वेदनांच्या खोलीत’ हे पुस्तक यवतमाळमध्ये अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनात प्रकाशित झाले. हे सर्व होत असताना 2004 मध्ये माझ्या जुन्या शाळेतील काही शिक्षकांना वाटलं की आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठीदेखील कविता लिहिल्या पाहिजे आणि माझा एक बालकवितासंग्रह प्रकाशित झाला. पुन्हा 2005 मध्ये मी ज्या कविता लिहिलेल्या होत्या त्या कवितांचा संग्रह मेस्को या संस्थेचे अध्यक्ष शफीक अहमद यांच्या सहकार्यातून प्रकाशित झाला. त्यानंतर एक दिवस प्रख्यात कवी अजीम नवाज राही म्हणाले की, आधी कविता समजून घे आणि मग कविता कर. तू कवितेचे बोट धरू नको, तर कवितेनं तुझं बोट धरलं पाहिजे. मग त्या आठ-दहा वर्षांमध्ये मी माझ्यातल्या कवीचा शोध घेत राहिलो. कविता समजून घेत राहिलो. कवितेने बोट धरण्याची वाट पाहू लागलो. 2018 मध्ये मागील दहा-बारा वर्षांमध्ये मी ज्या कविता लिहिल्या त्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्याची इच्छा चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक संजय वैद्य यांनी दर्शवली आणि त्यांच्याच प्रयत्नांतून ‘माझ्यातला कवी मरत चाललाय’ या नावाने 2018 मध्ये पुण्याच्या संवेदना प्रकाशनने हा कवितासंग्रह प्रकाशित केला, तरी अजूनही कवितेने माझं बोट घट्ट धरलेले नाही हे मला जाणवत आहे.

प्रश्न : आपल्याला पहिला पुरस्कार केव्हा मिळाला? त्या वेळी आपल्या भावना काय होत्या? आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार मिळाले?

उत्तर : मला पहिला पुरस्कार मिळाला तो लोकमत ज्ञानयात्रा नावाचा. त्यानंतर मौलाना अबुल कलाम आजाद सोशल फोरमचा पुरस्कार, शिवांजली साहित्यपीठाचा युवा साहित्यिक पुरस्कार,  ‘माझ्यातला कवी मरत चाललाय’ या कवितासंग्रहाला विदर्भ साहित्य संघाचा महत्त्वाचा आणि अतिशय प्रतिष्ठेचा असा शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार, नारायण सुर्वे वाचनालय नाशिकचा पुरस्कार, नाशिकचा साहित्यकणा पुरस्कार, अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक महामंडळाचा पुरस्कार, त्याचबरोबर उमरेड येथील साहित्ययात्री पुरस्कार मिळालेत. कार्यकर्ता म्हणून दिल्लीचा लोक सूर्या पुरस्कार आणि चंद्रपूर मराठी वृत्तपत्र संघाचा लीलाबाई बांगडे झेप गौरव पुरस्कार मिळाला, पण खरं तर हे सर्व पुरस्कार माझ्या कवितेला आणि माझ्यातल्या कार्यकर्त्याला मिळालेले आहेत.

प्रश्न : कविता वेदनेतून जन्म घेते, असे म्हणतात. आपल्याही बर्‍याच कविता वेदनेचे प्रतिनिधित्व करतात. याबाबत थोडे सांगा.

उत्तर : हे अगदी खरे आहे की कविता ही वेदनेतून जन्म घेत असते आणि माझ्याही कविता या वेदनेतून जन्म घेणार्‍या आहेत. कारण मी मुस्लीम म्हणून जगत असताना जे काही अनुभवले ते शब्दातून व्यक्त होत राहिले, पण विरोध करायचा म्हणून मी विरोध केला नाही, तर कवी म्हणूनही जगताना जे अनेक प्रश्न माझ्या वाट्याला आले त्या प्रश्नांची उकल माझ्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न केला. मनाला जी सल टोचत राहिली ती माझ्या कवितेतून मी व्यक्त करीत राहिलो. मुस्लीम युवकांचे प्रश्न किंवा अनेकांच्या नजरा माझ्याकडे कधी कधी जातीवादाच्या चष्म्यातून पाहत असतील; तोदेखील माझ्या कवितेचा विषय झालेला आहे. आज जे काही प्रश्न मला सतावत असतात मग ते मुस्लीम महिलांचे प्रश्न असतील, मुस्लीम लोकांचे प्रश्न असतील किंवा एकंदरीत माणूस म्हणून जगताना ज्या प्रश्नांना सतत मला तोंड द्यावे लागते ते प्रश्न मी माझ्या कवितेतून मांडत आलेलो आहे. कवी म्हणून मी प्रातिनिधिक स्वरूपात जगणे मांडतो. मग जेव्हा मी एखाद्या मुस्लीम युवकाची व्यथा माझ्या कवितेतून मांडत असतो त्या वेळेस ती केवळ त्या मुस्लीम युवकाची कथा राहत नाही, तर समस्त युवकांची ती कथा होते आणि म्हणून मला वाटते की माणसाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण कविता करतो आहे. त्यामुळे कविता वेदनेतून जन्मते हे शंभर टक्के खरे आहे.

प्रश्न : गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आपली कविता समाविष्ट आहे. त्याबद्दल आपल्याला काय वाटते?

उत्तर : मला त्या गोष्टीचा फार आनंद आहे की वयाच्या 33व्या वर्षी माझी कविता विद्यापीठीय अभ्यासक्रमात नेमलेली आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे बीए द्वितीय वर्षाला तृतीय सत्रात मराठी या विषयात माझी कविता आहे. त्यानिमित्ताने  मी अनेक महाविद्यालयांमध्ये जातो तेव्हा विद्यार्थ्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोण असा असतो की इतका युवा कवी आपल्याला अभ्यासक्रमात आहे. खरं तर कधी कधी त्यांचा विश्वासच बसत नाही की हेच इरफान शेख आहेत म्हणून. मी बीएच्या मुलांसमोर बोलतो त्या वेळेस त्या मुलांमध्ये एक नवीन ऊर्जा मला पाहायला मिळते.

प्रश्न : शेवटी या साहित्यक्षेत्रात येणार्‍या नवोदितांसाठी दोन शब्द सांगा.

उत्तर : संदेश देण्याइतपत मी मोठा नाही, पण तरीही नव्याने लिहिणार्‍या कवींना माझी एक विनंती आहे की त्यांनी आपल्या लिखाणाशी, आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहून लेखन करावे. साहित्य हे एका रात्रीत तुम्हाला स्टार बनवणारे क्षेत्र नाही, तर तुमच्यातल्या अनुभवांवरून तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार करणारी एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. अनेक कविता वाचा, समजून घ्या, वेगवेगळ्या प्रवाहातल्या कविता आपल्याला काय सांगू इच्छितात ते समजून घ्या. लिहीत राहा…

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply