पहिल्या दिवशी 87,500 रुपयांचा दंड वसूल
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड-19 विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत असल्याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मास्कचा उपयोग न करणार्या नागरिकांवर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यावर शुक्रवारी (दि. 19) पाहिल्याच दिवशी 87 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
राज्यातील काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसू लागल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मास्क न वापरणार्यांना 500 रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश प्रभाग समिती अधिकार्यांना दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारीमनपा क्षेत्रातील खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे भागातून एकुण 87500 एवढा दंड वसूल करण्यात आला.
मास्कचा योग्यरित्या उपयोग न करणार्या तसेच सार्वजनिक जागी थुंकणार्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी आदेश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी दिले आहेत. विना मास्क फिरणार्यांवर जरब बसवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने चारही प्रभागात सध्या होत असलेली कारवाई वाढविण्यात आली असता प्रभाग समिती ’अ’ – 10,500 रुपये, प्रभाग समिती ’ब’ -30,000 रूपये, प्रभाग समिती ’क’ -32,000 रुपये, प्रभाग समिती ’ड’ – 15,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. महापालिका क्षेत्रात मास्क न वापरणार्यांकडून 87 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आले.
आयुक्तांनी केलेल्या आदेशान्वये इतरही कारवाईस सुरुवात झाली आहे. यामध्ये लग्न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना/क्लब्ज, नाईट क्लब्ज, उपहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मिय स्थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे आढळल्यास आणि 50 पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास संबंधित व्यक्तींना दंड करण्यासोबत त्या-त्या ठिकाणच्या आस्थापनांवर, व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.