लंडन ः वृत्तसंस्था
सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविचने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनवर 6-4, 6-0, 6-2 अशी मात केली व उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत 32 वर्षीय जोकोविच अव्वल, तर 28 वर्षीय गॉफिन 23व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी दोघे सहा वेळा आमनेसामने आले. त्यात पाच वेळा जोकोविचने, तर एकदा गॉफिनने बाजी मारली. ग्रास कोर्टवर दोघे प्रथमच आमनेसामने आले होते. जोकोविचचेच पारडे जड मानले जात होते. पहिल्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर दोघांत 3-3 अशी बरोबरी होती. सातव्या गेममध्ये गॉफिनने जोकोविचची सर्व्हिस भेदली व 4-3 अशी आघाडी घेतली, मात्र त्यानंतर गॉफिनला सर्व्हिस राखता आली नाही. आठव्या गेममध्ये बाजी मारून जोकोविचने 4-4 अशी बरोबरी साधली. नवव्या गेममध्ये जोकोविचने सर्व्हिस राखली. आव्हान राखण्यासाठी गॉफिनला दहाव्या गेममध्ये सर्व्हिस राखण्याची आवश्यकता होती, मात्र अनुभवी जोकोविचने गॉफिनची सर्व्हिस भेदून पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. त्यानंतर दुसर्या सेटमध्ये जोकोविचने गॉफिनला प्रतिकाराची संधी न देता बाजी मारली.