Tuesday , March 28 2023
Breaking News

‘45 मिनिटांच्या खराब कामगिरीमुळे हरलो’

मँचेस्टर ः वृत्तसंस्था

’वर्ल्ड कपमध्ये सर्व सामन्यांत आम्ही दमदार कामगिरी केली, पण उपांत्य फेरीत 40 ते 45 मिनिटांच्या खराब खेळामुळे आम्हाला स्पर्धेतून बाहेर जावे लागले’, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. कोहलीने भारतीय संघाच्या गोलंदाजांचे कौतुक केले. ’गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडला रोखण्यात आम्हाला यश आले होते. 240 धावांचे लक्ष्य सहज गाठता येण्यासारखे होते, पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे कौतुक करायला हवे. त्यांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. सामन्यातील 40 ते 45 मिनिटांच्या खराब खेळामुळे आम्हाला स्पर्धेबाहेर जावे लागले’, असे कोहली म्हणाला. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे ढासळली. भारताला न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 221 धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाने 92 धावांवर सहा विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर जाडेजा व धोनीने संघाला सावरत 116 धावांची भागीदारी केली, मात्र दोघांचीही अर्धशतके व्यर्थ ठरली.

– किती दिवस रोहित, विराटवरच अवलंबून राहायचे?

रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी दिलेल्या झुंजीचे कौतुक वाटते; पण आपण आणखी किती दिवस फक्त रोहित आणि विराट यांच्यावरच अवलंबून राहणार आहोत? त्यांनीच येऊन विजयाचा पाया रचला पाहिजे का? होय मी निराश झालो आहे. कारण 240 धावांचे आव्हान आपल्या आवाक्यात होते यात शंकाच नव्हती. न्यूझीलंडने तीन विकेट्स झटपट मिळवून स्वप्नवत सुरुवात केली, जे कौतुकास्पदच आहे. भारतीय संघातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत लढायला हवे, असे भारताचा निवृत्त क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने सांगितले आहे.

– क्षेत्ररक्षणाने लढत फिरवली

उपांत्य फेरी असावी तर अशी. गेले दोन दिवस रंगलेल्या या लढतीचा निकाल आमच्या बाजूने लागला याचा आनंद सहाजिकच खूप मोठा आहे. सगळेच कठीण होते. परिस्थितीचा अंदाज आम्हाला आला. भारताप्रमाणे आम्हालाही असे वाटले होते की लढतीत धावांची बरसात होईल, पण 240 धावा करताना लागलेली धाप बघता आम्हाला खात्री होती की भारतावर दडपण आणता येईल. सुरुवातीच्या फलंदाजांना झटपट गुंडाळले तर अर्धी लढाई जिंकू असे डावपेच होते, असे केन विल्यमसन म्हणाला.

विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच आम्ही धोनीला एक विशिष्ट भूमिका सोपवलेली होती. सुरुवातीच्या 15-20 षटकांत चार-पाच बळी गेल्यास धोनी अखेरपर्यंत उभा राहून संघाला तारू शकतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आजही ठरल्याप्रमाणेच त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. जर शेवटची काही षटके शिल्लक असती तर कदाचित त्याला वरच्या स्थानावरही पाठवले असते, परंतु या सामन्यात धोनीने सातव्या स्थानावर फलंदाजी करणेच योग्य होते.

– विराट कोहली

आमच्या परीने आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली. भारताची फलंदाजी ही जगातील सर्वोत्तम आहे. अशा संघाला रोखणे अवघडच असते. आम्ही एकजूट होऊन खेळलो आणि सर्वोत्तम कामगिरी साकार झाली. 

– मॅट हॅन्री (सामनावीर)

‘कधीच हार मानू नये आणि पराभवानंतरही धीटपणे उभे राहावे हे मला नेहमीच खेळाने शिकवले. मला प्रोत्साहन देणार्‍या प्रत्येक चाहत्याचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तुमचा पाठिंबा असाच राहू द्या. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी चांगले खेळण्याचा प्रयत्न करीन.

-रवींद्र जाडेजा

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply