Breaking News

नवीन पनवेलमधील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी भविष्यात होणार्‍या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम पनवेल रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या

प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक पोलीसांची त्यावर तोडगा काढताना दमछाक होताना दिसत आहे.

महाराष्ट्र शासनाने मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी सिडकोची स्थापना करून नवी मुंबई शहर वसवले. त्यानंतर आणखी जागेची आवश्यकता वाटू लागल्याने सिडकोने पनवेल पूर्वेला वसाहत निर्माण केली. त्यावेळच्या सिडकोच्या अधिकार्‍यांनी भविष्यात होणार्‍या पनवेल आणि आजूबाजूच्या परिसराच्या विकासाचा वेध व्यवस्थित घेतला नाही. नवीन पनवेल बाजूला त्यावेळी जागा स्वस्त असल्याने अनेकांनी जागा घेतल्या. येण्या- जाण्यासाठी दुचाकी खरेदी केल्या. त्या उभ्या करण्यासाठी वाहनतळ अपुरे असल्याने रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात.  रेल्वे स्टेशनजवळील रस्त्यावर वाहतूक वाढणार याचा अंदाज सिडकोला आला नाही. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी ठेवली. आज तेथून नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला विचुंबे आणि उसर्लीकडे रस्ता जातो. डावीकडे एचडीएफसी सर्कलवरून खांदा कॉलनी, डी मार्ट, नेरे आणि आदईकडे, तर बिकानेर कॉर्नरवरून सरळ सुकापूर, नेरे येथे रस्ता जातो. या भागात मोठ्या प्रमाणात वसाहती झाल्याने नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत गर्दी असते.

नवीन पनवेलमधील प्रवेशद्वारावर असलेल्या एचडीएफसी आणि आदई चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. याबाबत नागरिक नेहमीच वाहतूक पोलिसांना दोष देत असत. तत्कालीन वाहतूक शाखेचे निरीक्षक विजय कादबाने यांनी सिडकोने या चौकातील सर्कल लहान केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल म्हणून सिडकोचे तत्कालीन कार्यकारी अभियंता पी. व्ही. मूल यांच्याकडे पत्रव्यवहार केल्यावर त्यांनी प्रस्ताव पाठवला. त्यामुळे एचडीएफसी चौक व आदई चौकातील सर्कल कमी करण्यास सिडकोने मंजुरी देऊन 55 लाख रुपये मंजूर केले. दोन्ही चौकातील सर्कल कमी करण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली, पण सिग्नल तोडणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली.  

बिकानेर कॉर्नरला रस्त्याच्या कोणत्याही बाजूला रिक्षा उभ्या असतात. रिक्षा स्टँडसाठी दिलेल्या जागेवर असतात त्यापेक्षा जास्त रिक्षा आजूबाजूला उभ्या केलेल्या असतात. अबोली रिक्षासाठी खास स्टँड देण्यात आला. त्या ठिकाणी काळी-पिवळी रिक्षाच उभी असते. एचडीएफसी सर्कलच्या दिशेने जाणार्‍या बाजूला पूर्वी रिक्षा स्टँड नव्हता. आता काही दिवसांपासून त्या बाजूला सकाळ-संध्याकाळ रिक्षा उभ्या असतात. त्यांची रांग अभ्युदय बँकपर्यंत असते. त्या ठिकाणी असलेल्या गॅरेज व दुकानांसमोर उभ्या असलेल्या वाहनांची एक लाइन असते. त्याच्या बाजूने रिक्षाची लाइन असते. त्यातच रिक्षा वळवण्यासाठी जागा नसल्यामुळे वाहतूक कोंडी होते. कर्नाळा बँकेजवळ कचराकुंड्या रस्त्यावर ठेवलेल्या आहेत. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कट्ट्याजवळ  एनएमटी बसचा थांबा आहे. त्या ठिकाणीच विचुंबेकडे जाणार्‍या रिक्षांचा थांबा आहे. गाववाल्यांच्या दुचाकींची गर्दीही असते. त्यांना वाहतुकीच्या नियमांचे बंधन नसते.सेक्टर 15मध्ये रस्त्यावर दोन्ही बाजूला  दुचाकी उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे चालायला जागाच नसते. 

बिकानेर कॉर्नरच्या सर्कलला सकाळ- संध्याकाळ वाहतूक पोलीस ठेवावा, ही मागणी अनेक वर्षे केली जात असूनही वाहतूक शाखेकडून  कर्मचारी कमी असल्याचे कारण देऊन दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस खाते रिक्षा परवाने वाटल्याबद्दल परिवहन खात्याला दोष देते. रिक्षांना मोठ्या प्रमाणात परवाने दिल्याने रिक्षा वाढल्या. त्यामुळे रिक्षा उभ्या करण्यासाठी जागा नाही, पण या वादात सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे. या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची तर पोलीस वाट पाहत नाहीत ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

-नितिन देशमुख

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply