अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात 267 इमारती धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्जतमध्ये सर्वाधिक 226 इमारती धोकादायक आहेत. या सर्व इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अलिबाग, कर्जत, माथेरान, रोहा, मुरुड आणि पेण नगरपालिकांनी आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केले. कर्जतमध्ये सर्वाधिक 226, अलिबाग 12, रोहा 10, पेण 9, मुरुड 4, माथेरान 6 धोकादायक इमारतींचा समावेश आहे. धोकादायक असलेल्या सर्व इमारतींमधील रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याची सूचना देण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका, महाड, श्रीवर्धन, उरण, खोपोली नगरपालिका आणि खालापुर, तळा, म्हसळा, माणगाव सुधागड येथील नगरपंचायती यांनी जिल्हाधिकार्यांच्या लेखी निर्देशानंतरही अद्याप आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केलेले नाहीत.