मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपने पत्रक काढून याबाबतची माहिती दिली. त्यामुळे रावसाहेब दानवेंऐवजी आता चंद्रकांत पाटील राज्याचे भाजप अध्यक्ष असतील, तर आशिष शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदाचा कारभार मंगलप्रभात लोढा हे सांभाळणार आहेत. भाजप खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी (दि. 16) दिल्लीत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांच्याकडे राज्यमंत्रिपदाचा भार आहे. ते ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाची नियुक्त होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. या शर्यतीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी पाटील यांना पसंती होती. अखेर त्यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुका या पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत; तर राज्याच्या कॅबिनेटपदी संधी मिळाल्यानंतर आशिष शेलार यांच्याकडील मुंबई भाजप अध्यक्षपद काढून घेत त्या पदावर आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.