Breaking News

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नितीनचा मृत्यू

पालकांचा आरोप; चौकशी करून कारवाईची मागणी

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या नितीन हरिभाऊ घरत (35) या तरुणाचा केअरपॉइंट दवाखान्यातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत मुलाचे पालक हरिभाऊ घरत यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणीही पालकांनी केली असल्याचे समजते.

नितीन घरत हा सोनारी गावाजवळील स्पीडी कंपनीत कामाला होता. नितीन रविवारी (दि. 14) कामावर गेला होता. त्या ठिकाणी त्याला चक्कर आल्याने कंपनीतील इतर सहकार्‍यांनी सकाळी 10 वाजता उरण येथील केअरपॉइंट दवाखान्यात दाखल केले. मंगळवारी (दि. 16) सकाळी 9 वाजता नितीन नाष्टा करीत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्यानंतर दवाखान्यातील सिस्टरने आयसीयूमध्ये दाखल केले. त्या वेळी कोणीही डॉक्टर उपस्थित नसल्याने सर्वजण डॉक्टरांची वाट पहात राहिले. बर्‍याच वेळेनंतर म्हणजे 10.30 वाजता डॉक्टर दवाखान्यात आले. त्यानंतर कोणतेही उपचार न करता डॉक्टरांनी नितीन मयत झाल्याचे सांगितले.डॉक्टरांनी नितीनवर वेळीच उपचार करताना हलगर्जीपणा केला नसता, तर त्याचा जीव वाचला असता. त्यामुळे नितीनचा मृत्यू हा डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नितीनचे वडील हरीभाऊ घरत यांनी केली आहे. दरम्यान, मयत नितीनच्या मृत्यूचे निश्चित कारण समजण्यासाठी त्याचा मृतदेह विच्छेदनाकरिता मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. अशा प्रकारची घटना यापूर्वीही घडली होती, पण ती उघड झाली नसल्याची चर्चा उरण परिसरात सुरू आहे. याबाबत केअरपॉइंटच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याबाबत मी तुमच्याशी नंतर बोलतो असे सांगितले, मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारे संपर्क केला नसल्याचे समजते. नितीनच्या जाण्याने पत्नी व दोन लहान मुले उघड्यावर पडली आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply