Breaking News

सर्वस्पर्शी भाजप, सर्वव्यापी भाजप!

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र असताना, दुसरीकडे देदीप्यमान यश मिळविणार्‍या भारतीय जनता पक्षाने स्वस्थ न बसता अधिक जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष सदस्य व नवीन मतदार नोंदणी अभियानाद्वारे संपूर्ण देशभरात पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात आहे.

भाजपकडून दर तीन वर्षांनी सदस्य नोंदणी अभियान राबविले जाते. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त 6 जुलैपासून प्रारंभ झालेले यंदाचे अभियान 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ‘सर्वस्पर्शी भाजप, सर्वव्यापी भाजप’ या संकल्पांतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना पक्षाचे सदस्य करून घेतले जाणार आहे. देशात भाजपचे 11 कोटी सदस्य असून, हा एक जागतिक विक्रम आहे. तो या वेळी भाजपकडूनच मोडला जाण्याची चिन्हे आहेत.

यशात सातत्य ठेवून नवे लक्ष्य गाठण्यासाठी कशा प्रकारे तयारी करावी, याचा वस्तुपाठ भाजपने घालून दिला आहे. मुळातच भाजप हा शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. आधी राष्ट्र, मग पक्ष आणि नंतर स्वत: अशी कार्यपद्धती असणार्‍या भाजपने दोनपासून 303 खासदारांपर्यंत मारलेली मजल थक्क करणारी आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी घातलेल्या पायावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी खर्‍या अर्थाने कळस चढविला आहे. पराभवाने खचून आणि विजयाने हुरळून जायचे नसते ही बाब त्यांनी शब्दश: सत्यात उतरविली. त्यातून घडलेला इतिहास सर्वांसमोर आहे. विशेष म्हणजे अभूतपूर्व यश मिळूनही मोदी-शहा यावर समाधान मानायला तयार नाहीत. ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे सरकार आहे तेथे भाजपची सत्ता आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने पक्ष मजबूत करण्यावर जोर देण्यात येत आहे. भविष्यात संपूर्ण देश भाजपयुक्त झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून, शेवटच्या स्तरापर्यंत कार्यकर्त्यांची फळी व संघटन मजबुतीसाठी सदस्य नोंदणी अभियान जोमाने राबविण्यात येत आहे. राज्यात 95 हजार 400 बूथ आहेत. प्रत्येक बूथवर 50 नवीन सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे 50 लाख नवीन सदस्य होतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी नेते, पदाधिकारी, विस्तारक, बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, पन्नाप्रमुख अशी वरिष्ठ स्तरापासून कार्यकर्त्यांपर्यंतची फळी कामाला लागली आहे.

आगामी विधानसभा रणसंग्राम लक्षात घेऊन राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा गेल्याच महिन्यात विस्तार झाला. त्यानंतर भाजपने नुकताच प्रदेशाध्यक्षपदीही नवा चेहरा दिला आहे. रावसाहेब दानवे यांना केंद्रात आणि आशिष शेलार यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याने त्यांच्या जागी अनुक्रमे चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रकांतदादांनी कमी कालावधीत आपल्या कामाची छाप पाडली आहे. त्यांना आता व्यापक प्रमाणात काम करण्यास वाव आहे.

दुसरीकडे काँग्रेसनेही प्रदेशाध्यक्ष बदलला आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे निष्ठावंत नेते असलेल्या थोरात यांच्यासमोर पक्षातील गळती रोखून संघटना बांधण्याचे मोठे आव्हान आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात यावर त्यांच्यासह काँग्रेसचे राज्यातील भवितव्य अवलंबून असणार आहे. सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच भाकरी फिरवत सुनील तटकरे यांना राष्ट्रीय राजकारणात आणून माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली आहे. शिवसेनेत किरकोळ बदल वगळता परिस्थिती ‘जैसे थे’ आहे; तर लोकसभा निवडणुकीत लक्ष वेधलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अस्तित्वाच्या विवंचनेत आहेत. एकंदर सत्ताधारी जोमात आणि विरोधक कोमात अशी राजकीय सद्यस्थिती आहे.

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply