कर्जत ः बातमीदार
मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची तुफान गर्दी दिसत आहे, पण कर्जत तालुक्यातील सर्व पाणवठ्यांवर जाण्यास घातलेली जमावबंदी यामुळे कर्जत तालुक्यातील किमान 25 ठिकाणी पावसाळ्यात दिसणार्या अलोट गर्दीला ओहोटी लागली आहे. पावसाला सुरुवात झाली की कर्जत परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेले रूप प्राप्त होते. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. आता मोबाइल कॅमेर्यातही उत्तम दर्जाचे छायाचित्रण करणे शक्य असल्याने एखाद्या ठिकाणची छायाचित्र काही क्षणात सोशल मीडियावर अपलोड होतात व तितक्याच लाईक्सच अन् पोस्ट शेअर केल्या जातात व इतरांचे एकदा तरी जाऊ या, म्हणत नियोजन ठरविले जातात. याआधी माथेरान या थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेला कर्जत तालुका पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जाऊ लागला. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या डोंगर कपारीतील फेसाळत वाहणार्या धबधब्यांमुळे विकेंडला येणार्यांची भलतीच गर्दी होत असते. या जमावबंदीचा सर्वात जास्त परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने ऐन हंगामात हा व्यवसाय थंडावल्याचे चित्र आहे. नेरळ, कशेले, कर्जत येथील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळतो. सोलनपाडा तसेच इतर धरणांवर गर्दी कमी झाल्याने मद्यविक्रीवरदेखील परिणाम झाला आहे. दिवसागणिक 50 ते 60 हजारांची दारू विकली जात होती, पण मद्यपींचा पूर ओसरल्याने खप कमी झाल्याचे समजते. येथील वाहतूकदारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. नेरळ व कशेले येथून पर्यटनस्थळी पोहचवणारे खासगी वाहनचालक नाराज आहेत. पर्यटनामुळे दिवसागणिक 2500 ते 3000 इतकी कमाई होत होती, पण पर्यटकांनी पाठ फिरवल्याने 1000 रुपये कमविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
कर्जत तालुक्यात पावसाळी पर्यटनाला आलेल्या अनेक पर्यटकांचे मागील काही वर्षांत सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून पोलीस दल पावसाळ्यात वर्षासहलीसाठी येणार्यांना रोखण्यासाठी तैनात करावे लागत असतात. त्यात दुर्घटना घडली की मग प्रशासन कामाला लागते. प्रसंगी रात्रीचा दिवस करावा लागतो. त्यामुळे शासनाच्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करीत आहोत.
-अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत
प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याने आषाणे तसेच अन्य धबधब्यांवर येणारे पर्यटक कमी झाल्याने त्याचा परिणाम व्यावसायिकांवर झाला आहे. त्यामुळे हा जमावबंदी आदेश असाच सुरू राहिल्यास कर्जतमधील पर्यटनस्थळे विकसित होण्याऐवजी पर्यटन व्यवसाय धोक्यात येणार आहे.
-सागर शेळके, हॉटेल व्यावसायिक