Breaking News

अभिमानास्पद झेप!

या अवघ्या विश्वाच्या पसार्‍यात खोलवर दडलेल्या गुपितांचा शोध अन्य प्रगत देशांच्या अंतराळ संस्थांप्रमाणेच आपली इस्रोही घेत आहे. अंतराळ मोहिमांतून भारतच नव्हे तर अवघ्या मानवतेच्या भवितव्याच्या दृष्टीने अस्सल, व्यवहार्य उपाययोजनांचा शोध घेण्याचे ध्येय इस्रोने बाळगले आहे. चंद्राच्या अस्तित्वाचा संपूर्णपणे धांडोळा घेणे हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

अवघ्या देशभरातीलच नव्हे तर जगभरातील भारतीयांची मान अभिमानाने उंचावत चांद्रयान-2 आज दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी म्हणजेच ठरलेल्या वेळेवर अंतराळात झेपावले. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यानाचे प्रक्षेपण करण्यात आले आणि गेल्या आठवडाभरापासून या क्षणाची आतुरतेने वाट पाहणार्‍या देशवासियांनी विविध समाजमाध्यमांवर आनंद व्यक्त केला. हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने गेल्या 15 जुलै रोजी उड्डाणाच्या 56 मिनिटे आधी चांद्रयान-2चे उड्डाण रद्द करण्यात आले होते. तांत्रिक दोष आढळल्यानंतर अकारण धोका पत्करून ठरल्या वेळेवर प्रक्षेपण पार पाडण्याचे तेव्हा इस्रोने टाळले आणि पुढचा दिवस निश्चित केला. दरम्यानच्या काळात तांत्रिक दोष दूर करून अनेक चाचण्या घेण्यात आल्या. तांत्रिक बिघाडांची शक्यता नसल्याची खातरजमा करूनच आज चांद्रयान-2चे प्रक्षेपण करण्यात आले. कधी कधी मोठ्या यशासाठी दोन पावले मागे यावे लागते, तसाच काहिसा हा निर्णय होता. तो इस्रोने प्रगल्भतेने घेतला याचीही अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात निश्चितच नोंद होईल. चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण धु्रवाजवळील भागाचा अभ्यास करण्याचे मुख्य उद्दिष्ट या मोहिमेमागे आहे. प्रक्षेपणानंतर 45 दिवसांत हे यान चंद्राच्या कक्षेत जाऊन पोहोचणार आहे. यान चंद्रापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असताना त्याचा वेग कमी करण्यात येईल. शेवटची 15 मिनिटे अतिशय महत्त्वाची असून चंद्राच्या दक्षिण धु्रवाभोवती घिरट्या घालून नंतर लँडर तेथे सॉफ्ट लँडिंग करील. अशातर्‍हेने सॉफ्ट लँडिंग करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. 6 सप्टेंबरला हे यान चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे. या काळात पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे 3 लाख 84 हजार किमीचे अंतर हे यान पार करील. यानात लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान असे दोन भाग अंतर्भूत आहेत. विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर सुमारे चार तासांनी प्रज्ञान बाहेर येईल व चंद्राच्या भूमीचे परीक्षण करून संबंधित माहिती व छायाचित्रे तो इस्रोकडे पाठवील अशी ही संपूर्ण मोहीम आहे. अज्ञातात भविष्यातील मानवी जीवनासाठीची उत्तरे शोधणे हे या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी असून अर्थातच या प्रयत्नांतून मानवी वैज्ञानिक ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार आहेत. नव्या शोधांना चालना मिळणार आहे. नव्या आर्थिक घडामोडींनाही बळ मिळू शकणार आहे. भारताची पावले अंतराळात ठळकपणे उमटण्यासाठी हे आवश्यक असून आंतरराष्ट्रीय समुदायाच्या संयुक्त महत्त्वाकांक्षांना यातून बळकटी मिळेल. आपल्या सौर मंडलाच्या अस्तित्वाविषयीच्या अनेक मूलभूत प्रश्नांची उत्तरे कदाचित चंद्रावरील विवरांतून, डोंगर-दर्‍यांतून सापडू शकतील. त्यांचाच शोध घेण्यासाठीची ही धडपड असून चांद्रयान-2 च्या मोहिमेतून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकडे संशोधकाच्या भूमिकेतून वळण्याची प्रेरणा तरुण पिढीला मिळू शकेल. तसेच एकंदर भारतीय समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन देखील अधिक बळकट होईल हे निश्चित. अवघ्या देशासाठी अभिनंदनीय अशा या क्षणाच्या सगळ्यांना शुभेच्छा!

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply