कोकणात साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात जातात मंडळी, पण पावसाळ्यात कोकण म्हणजे अगदी स्वर्ग असतो. मी तर मनाने कायमच कोकणात असते पावसाळ्यात आणि हे सर्व अनुभवत असते. ह्या अनुभूतीत तुम्हालाही सामील करून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.
पावसाळ्याचं आणि कोकणाचं माझ्या मनात एक अतूट नातं आहे. कोकण तसं तर वर्षभर सुंदरच दिसतं पण त्याचं रूप सर्वात खुलून येतं ते पावसाळ्यात. मी पहिल्यांदा गेले कोकणात तेच मुळी पावसाळ्यात. ढगांची दुलई पांघरलेला बावडा घाट श्वास रोखत पार करून कोकणात प्रवेश केला आणि मग मात्र त्या हिरवाईने मनाला जी भुरळ घातली ती अगदी आजपर्यंत. मग पुष्कळ वेळा पावसाळ्यातही निरनिराळ्या वेळी कोकणात, घरी जाणं झालं आणि कोकणातलं पावसाळ्यातलं नित्य नव रूपही तितकच मोहवणारं भासलं.
आंब्या, फणसाचा आणि रतांब्यांचा मोसम चालू असतो तोपर्यंत रोज चार दिवस येऊ नको रे बाबा, तेवढी आंब्यांची काढणी होऊ दे, मग ये, असं विनवलं जातं पावसाला. पण एकदा का सीझन संपला आंब्याचा की मग मात्र त्याची अगदी आतुरतेने वाट पहिली जाते. आठ पंधरा दिवस आकाशात ढग जमवून त्यानेही तयारी केलेलीच असते. एखाद दिवशी संध्याकाळी किंवा रात्री ताशे वाजंत्र्यांच्या गजरात आगमन होतं या हव्या हव्याशा वाटणार्या पाहुण्याचं. कितीही तयारी केली असली तरी पहिल्या पावसात तारांबळ उडतेच. कारण घरावरची कौलं दरवर्षी शाकारली तरी कुठेतरी फट राहून पाणी गळती होतेच. मग गड्याला वर चढवून ते गळतं काढलं जातं. मागील दारचा आणि खळ्यातला मांडव ही झापा कुजून खराब होऊ नये म्हणून तातडीने काढला जातो. मांडव काढला की खळं खूप मोकळं मोकळं दिसायला लागतं. मुलांचे क्रिकेट वगैरेसारखे खेळ मांडवाचा अडसर नसल्याने अधिक रंगतात. पण ते थोडे दिवसच. कारण एकदा का पावसाची झड बसली की आठ आठ दिवस संततधार सुरू असते कोकणात. मग खळ्यात खेळणं तर सोडाच पाच मिनीटं बसताही येत नाही.
पावसाच्या आगमनाबरोबरच भात शेतीची कामं सुरू होतात. भरपावसात ही कामं करावी लागतात. आमच्याकडे काही जमीन उतारावरची आहे. त्यामुळे तिथे वेगवेगळ्या लेव्हलला भातशेती केली जाते. ते शेत फार सुंदर दिसतं. लावणीच्या वेळी भरपूर पाऊस आणि चिखलही लागतो. घरातली मुलं आवर्जून जातात मजा करायला आणि चिखलात लोळायला. आमचे काही गडी खूप गमत्ये आहेत. ते मुलांना मुद्दाम चिखलात लोळवितात वगैरे. मुलांना काय तेच हवं असतं. घरातल्या बायकाही चहा, बिस्कीटं, वडापाव वगैरे द्यायच्या निमित्त्ताने जातात शेतावर. खाली गुडघाभर चिखल पाणी, वरतून मुसळधार पाऊस, गारठलेली हवा आणि हातात तो लाल चहाचा कप.
भातशेतीबरोबरच नाचणी, वरी, हळद, आरारूट हेही लावलं जातं थोडं थोडं. कसं काय ते माहीत नाही, पण लावणीच्या दिवशी रात्रभर बेडकांच संगीत सुरू असतं. आमचं शेत तसं घराजवळच आहे. रात्री त्यांच डराव डराव घरीही ऐकू येतं. भात लावताना थोडं थोडं अंतर सोडून रोपं लावलेली असतात, पण थोडेच दिवसात रोपं वाढतात आणि एक हिरव्या रंगाचा गालिचाच तयार होतो शेतात. गणपतीच्या सुमारास काही पिकात गोड दुधाचा दाणा तयार होतो. त्यावेळी शेतात अतिशय सुंदर सुवास पसरतो त्या दाण्यांचा. चारी बाजूने घनदाट झाडी, पावसाळी हवा, दुरुन येणारा व्हाळाच्या पाण्याचा खळखळाट आणि मध्ये आमचं शेत. जगातलं सर्वात सुंदर दृश्य असतं ते. वार्यावर हे शेत जेव्हा डुलतं ना तेव्हा तर विचारुच नका किती सुंदर दिसतं ते.
लावणीचं मुख्य काम झालं की मग गडी आंब्यांच्या कलमांकडे वळतात. कलमांची टाळमाती, कलमांभोवती असलेले गडगे दुरुस्ती, नवीन कलमांची लागवड वगैरे कामं असतात.
घराजवळही परसदारी काकडी, कार्ली, दुधी, पडवळ यांचे वेल मांडवावर सोडले जातात. सड्यावरच्या मांगरावर लाल भोपळ्याचे वेल सोडले जातात. उन्हाळ्यात मरगळलेलं अळूही पावसाळ्यात चांगलंच फोफावतं. त्रिपुरी पौर्णिमेला आमच्याकडे कोहाळा लागतो खरा पण कोकणात कोहाळा हा अशुभ समजला जातो. मुद्दाम लावला जात नाही. पण कधी कधी आपोआपच कोहाळ्याचे वेलही रुजून येतात. घरच्या भाज्या काहीही मसाला न घालताही चवीला अप्रतिम होतात. काकडी तर मुलं एक ठेवत नाहीत मांडवावर. पावसाळ्यात आमच्याकडे फुलांचा महोत्सवच असतो जणू. अनंत, अनेक प्रकारच्या तगरी, कर्दळी, सोनटक्का, गावठी गुलाब, प्राजक्त, विविध रंगाच्या आणि आकारच्या जास्वंदी, संध्याकाळी फुलणारी गुलबाक्षी वगैरे आमच्या आगराची शोभा वाढवत असतात. पावसात गुरांना ओला चारा मिळतो, पण गुरांनी कुणाच्या शेतात तोंड घालून नुकसान करू नये म्हणून ह्या दिवसात गुरांच्या पाठी राखण्ये (गुराखी) असतात दिवसभर. चार-पाच राखण्ये मिळून सड्यावर मजा करत असतात. तेव्हा कृष्णाची आणि त्याच्या सवंगड्यांची आठवण येते पण त्याच वेळी ही मुलं शाळेत का शिकायला जात नाहीत हाही विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. सड्यावर हिरव्या कुरणात चरणारी गुरं फार लोभस दिसतात. पण सड्यावर जायच्या वाटेच्या दोन्ही बाजूला आपल्या कंबरेपर्यंत गवत माजलेलं असतं. पावसाची काळोखी आली असेल तर तिथून जाताना भीतीच वाटते.
पावसाळ्यातली आणखी एक सनसनाटी घटना म्हणजे आमच्या घरामागेच असणार्या व्हाळाला (वहाळाला) येणारा हौर म्हणजे पूर. तीन-चार तास जोरात पाऊस झाला तर हा वहाळ दुथडी भरून वाहू लागतो. पाण्याला प्रचंड वेग आणि खळखळाट असतो. ते चहासारख्या रंगाचं पाणी पाहायला मग मंडळी अगदी छत्र्या वगैरे घेऊन व्हाळापर्यंत जातात. कधी कधी पाणी साकवावरूनही वाहत असतं. तेव्हा मात्र इकडची मंडळी तिकडे जाऊ शकत नाहीत. थोडा वेळ सगळं ठप्प होऊन जातं. खूप मोठा हौर असेल तर व्हाळाचं पाणी आमच्या आगरातही शिरत कधी कधी. कोकणातल्या विहिरी खूप खोल असतात, पण व्हाळाला हौर आला की आपसुक़च विहिरींचंही पाणी वर येतं. इतकं की रहाटाशिवायही काढता येईल. कोकणातला हौर तो, जसा येतो अचानक तसा पाऊस जरा कमी झाला की ओसरतोही लगेच, पण हौर येऊन गेला की व्हाळ मात्र अगदी साफ, स्वच्छ आणि नितळ होऊन जातो. ढगाळ हवेमुळे भरदिवसाही घरात विशेषकरुन माजघरात आणि देवघरात अगदीच कमी असतो उजेड. अशा वेळी देवघरात भरदिवसाही निरांजनं तेवत ठेवली जातात. त्यांचा मंद, शांत आणि स्निग्ध प्रकाश एक प्रकारची समाधानाची गुंगीच आणतो मनावर. लाइट घालवले म्हणून मनोमन आभारच मानते मी वीज
मंडळाचे. असो. घरातल्या बायकांची आंब्या-फणसाची आणि इतर उन्हाळी कामं झाली असली तरी अगदी वटसावित्रीपासून ते गौरीगणपतीपर्यंत अनेक सण उत्सव असतातच पावसाळ्यात. नागपंचमीच्या दिवशी अगदी भक्तिभावाने आगरातच असलेल्या वारुळाचे पूजन केले जाते. पिकाची नासाडी करणार्या उंदरांचा नाश नागोबा करतात म्हणून. मंगळागौर, हरितालिका, श्रावणी सोमवार, शनिवार हेही जोरात साजरे करतो आम्ही. त्यामुळे घरातही एकंदर उत्साहाचेच वातावरण असते.
(साभार ः मायबोली)