कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यात सिंधदुर्गातील दशावतार असेल किंवा रत्नागिरी-रायगडमधील नमन, जाखडी. आजही कोकणातील मंडळींनी या लोककला जपल्या आहेत, पण नमन लोककलेची साधी नोंदही शासकीय दरबारी नाही. नमन कलाकारांची ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा’ अशी वाईट स्थिती आहे. त्यामुळे या लोककलेला राजाश्रयाची खर्या अर्थाने गरज आहे.
मुंबईतील मुलुंड येथे झालेल्या 98व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील लोककला सादर करण्याची संधी कलाकारांना मिळाली. सलग 60 तास चाललेल्या या नाट्यसंमेलनात रत्नागिरीतील समर्थ कृपा प्रॉडक्शनच्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्यातील कलाकारांनी नमन सादर केले व पहाटे पाच ते सात या वेळेत प्रेक्षकांसह संतोष पवार, शरद पोंक्षे, अविनाश नारकर अशी कलाकार मंडळीही नमन पाहत होते. नमन नाट्यसंमेलनातून जगभर पोहचले, पण राजदरबारात त्याची नोंद झाली नाही.
दशावताराचे महोत्सव शासनाकडून भरवले जातात, पण नमन सादर करणारी हजारो मंडळे मात्र दुर्लक्षित आहेत. नमनाचे महोत्सव होत नाहीत. या कलेची शासन दरबारी नोंद नाही.
कोकणात नमन तथा खेळे, शक्तीतुरा म्हणजे जाकडीनृत्य, भारूड, डफावरील पोवाडे इ. कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेची प्रसिद्धी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक, पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवासीय जोपासत आहेत. या लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यातील लोकांनी शासनाच्या अनेक योजना या लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे. झाडे लावा-झाडे जगवा, पाणी वाचवा, नशाबंदी, वृक्षतोड थांबवा, स्त्रीभ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व इ. विषयांवर या लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. याच कलेचे दुसरे रूप सिंधुदुर्गमध्ये पाहावयास मिळते. त्याला ‘दशावतार’ या नावाने ओळखले जाते. नमन आणि दशावतार यामध्ये बरेच साम्य आहे.
अठराव्या शतकात शामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला, त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावला, तर नमन उत्तर कोकणात होऊ लागला. नृत्य, नाट्य, संगीत यांनी परिपूर्ण असा हा लोककला प्रकार यक्षगान या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो.
नमन खेळाची सुरुवात गावदेवीची राखण देऊन मृदंगावर थाप पडते. लग्नाच्या कार्यात, होली (शिमगोत्सव) या काळात या खेळाला बहर येतो. कोकणच्या या नमन लोककलेत 30-40 लोक सहभागी असतात. एका विशिष्ट झगेदार पोशाखात हे कलाकार दोन रांगेत आडवे-उभे राहतात. प्रत्येकाच्या हातात टाळ, डोक्यावर रंगीबेरंगी पगडी, अंगाखांद्यावर रंगीत ओढण्या असतात. या प्रत्येक कलाकारांना खेलीया असे म्हणतात. मध्यभागी सूत्रधार असतो. देवाच्या नावाने हा सूत्रधार नमनाला सुरुवात करतो. बारा किंवा सोळा नमने गायली जातात. यामध्ये दोन मृदंग वाजवणारे असतात. एका पायावर जड मृदंग घेऊन ठेका धरून मृदंग वाजविणारे नाचू लागल्यावर प्रेक्षकांना दाद द्यावीच लागते. या नमन खेळ प्रकारात पोशाख म्हणून डोक्याला फेटा, टिळा, कानात डुल घातलेले असतात. संपूर्ण शरीरभर स्त्रियांच्या घाग याप्रमाणे एक वस्त्र परिधान करून लोकांचे मनोरंजनाचे काम केले जाते. गळ्यात मण्यांच्या माळा घातलेल्या असतातच. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृदंग वाजवण्याची कला असते. शिवाय या मृदंगचा आवाजही मंत्रमुग्ध करणाराच असतो.
नमन या लोकनृत्यामध्ये अनेक सोंगे असतात. सोंगात प्रथम मान गणपतीरायाचा असतो. गणपती पूजन व गणपती गाणे होते. गणेश पूजनात गणेशाची आख्यायिका असते. ही सोंगे झाडांच्या लाकडापासून बनवलेली असतात. मात्र, आजच्या तारखेला ही सोंगे अनेक प्रकारची हलकी व प्लास्टिक, फायबर याची बघायला मिळतात. गणपतीच्या आगमनवेळी इतर सोंगेही दाखवली जातात. यामध्ये नटवा असतो. शंखासूर, वाघ, हरण आदी असून या प्रकारात वापरल्या जाणार्या तलवारी लाकडी किंवा लोखंडी असतात. गण झाल्यावर गवळण प्रकाराला सुरुवात होते. हा भाग खूपच मजेदार व ऐकण्यासारखा असतो. दही, दूध, लोणी घेऊन गवळणी मथुरेच्या बाजाराला जात असतात. त्यांची वाट गोकुळातील पेंद्या, सुदामा व कृष्णाचे सवंगडी अडवतात. त्यावेळी गोपिका व पेंद्या, सुदाम यांच्यातर्फे अनेक गाणी व वेगवेगळ्या कला सादर होतात. कृष्णाचे सवंगडी गवळींची वाट अडवत त्यांच्या बाजारात विक्रीसाठी
जाणार्या मालाची लूट करतात. माठही फोडतात. या वेळी गवळणींमधील ज्येष्ठ अशी विनोद करून रसिकांना हसायला भाग पाडते. गवळणीनंतर कौटुंबिक जीवनावर आधारित पण एक चांगला संदेश देणारी छोटीशी नाटिका सादर करतात. या नाटिकेचा विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारा असतो. या संपूर्ण नमन खेळात शिपाई हे पूर्वीच्या काळातील पोलीस दलातील हवालदारप्रमाणे असतात. गंभीर विषय विनोदी करून सांगताना त्यातून अनेक संदेश दिले जातात. आपल्या अभिनयातून सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत असतात.
शेवटी वगनाट्यात महाभारत, नल-दमयंती आदी कथा किंवा एखादा सद्यस्थितीचा विचार करून कथाभाग सादर करण्यात येतो. परमेश्वर धारण केलेल्या दहा अवतारांवर आधारित सोंगे आणणे, त्यांच्या जीवनावरील काही घटना, प्रसंगाचे खेळातून दर्शन घडवणे हा या नाट्याचा उद्देश असतो. आजच्या घडीला बदलत्या काळाप्रमाणे नवे-जुने यांचा स्वीकार करत आजचे आधुनिक नमन मुंबईसह कोकणात पाहावयास मिळत आहे.
मुंबईत दामोदर नाट्यगृह, रवींद्र नाट्यगृह, साहित्य संघ, दीनानाथ नाट्यगृह या ठिकाणी कोकणातील मंडळांतर्फे देवदेवतांच्या मंदिर जीर्णोद्धार, शाळा उभारणीसाठी निधी जमा करण्यासाठी नमन, खेळे किंवा शक्तीतुरा कार्यक्रम लावताना दिसतात. संघ, प्रतिष्ठान यांच्यातर्फे चाकरमान्यांचा नमन पाहता यावे म्हणून याच कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. मुंबईकर चाकरमानीही उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. आज या नमन, खेळे, शक्तीतुरा कार्यक्रमात स्त्रीपात्र महिला वर्गच करताना दिसतो. आधुनिकतेप्रमाणे सध्या या लोककलेकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. त्याचे रूपही बदलत आहे. पारंपरिक पद्धतीत आधुनिकतेची भर पडली आहे, मात्र दशावताराप्रमाणे या नमन लोककलेला मानाचे स्थान प्राप्त झाले नाही. कोकणात नमनाच्या संवर्धनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. कोकणात या कलेला जनाधार असतानाही शासन या कलेकडे दुर्लक्षच करत आहे. याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोकणचे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्षच आहे. तमाशाला सोन्याचे दिवस आले, मात्र शासनाच्या दुर्लक्षपणामुळे नमन या कलेला वाईट दिवस आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
-योगेश बांडागळे