पनवेल ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केले असून, सिडको अध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
करण्यात आला. दहावीचा मार्च 2019 परीक्षेचा शाळेचा निकाल 98.21 टक्के लागला आहे. यामध्ये 20 विद्यार्थ्यांनी 75 टक्क्यांवर, तर तब्बल 25 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उज्ज्वल यश मिळविले. 92 टक्के गुण मिळवून ओंकार सोबळे याने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. अवनित यादवने 88 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला असून, त्याने गणितात 98 गुण मिळविले आहेत, तर मृणाली डुकरे या विद्यार्थिनीने 87.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. शाळेचे दहावीचे हे पहिलेच वर्ष असूनही विद्यार्थ्यांनी परिश्रमाने शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. सोमवारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, रयत शिक्षण संस्थेचे पीआरओ कारंडे, कवितके सर, शाळेच्या पर्यवेक्षिका कुसुम प्रजापती यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता.