पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील निगडे गावाजवळील निगडी नदीत रविवारी (दि. 28) मुंबई चुनाभट्टी येथील पर्यटक रवी चव्हाण बुडाल्याची घटना घडली होती. अद्यापही त्या बुडालेल्या तरूणांचा तपास लागला नाही.
वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई चुनाभट्टी येथील नऊ पर्यटक रविवारी पर्यटनांसाठी निगडे गावाजवळील निगडी नदीकिनारी गेले होते. त्यापैकी काहीजण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी रवी चव्हाण (वय 38, रा. चुनाभट्टी, मुंबई) हा पाण्यात बुडून वाहून गेला. या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी जाऊन तेथील पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला, मात्र रवी चव्हाण यांचा अद्याप शोध लागलेला नाही. निगडी नदी पुढे अंबा नदीला जाऊन मिळते तर पुढे धरमतर खाडी व ही खाडी अरबी समुद्राला जाऊन मिळते. सध्या या भागात मुसळधार पाऊस पडत असून नदीच्या प्रवाहाचा वेगदेखील जास्त असल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण होत आहे.