Breaking News

ड्रोनद्वारे गावठाण सर्व्हेकरिता सहकार्य करावे

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांचे प्रतिपादन

अलिबाग : जिमाका

गावठाण भूमापन प्रकल्प योजनेत भारतीय सर्व्हेक्षण विभाग (सर्व्हे ऑफ इंडिया) मार्फत जिल्ह्यात स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतीचे सर्व्हे करण्यात येणार असून नागरिकांनी ड्रोनद्वारे सर्व्हेसाठी येणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात ड्रोनव्दारे गावठाणातील मिळकतीच्या सर्व्हेबाबतच्या आढावा बैठकीत डॉ. बैनाडे बोलत होत्या.

रायगड जिल्ह्यातील एक हजार 696 महसुली गावे आणि एक हजार 187 वाडया/पाडे असे एकूण दोन हजार 882 गावठाणांचे स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण होणार आहे.

त्याअनुषगांने भूमी अभिलेख, ग्रामविकास,  महसूल, पोलीस आणि नगररचना या विभागांची संयुक्त बैठक झाली आहे. ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करताना ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, तलाठी व भूमापक यांच्या कर्तव्य आणि जबाबदार्‍या शासनाच्या परिपत्रकात दिल्या असून त्याप्रमाणे प्रत्येकाने आपआपली कामे जबाबदारीने पूर्ण करावीत, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. बैनाडे यांनी यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या.

भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक सचिन इंगळी यांनी ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे गावठाण भूमापन करण्यासाठी स्वामित्व योजनेंतर्गत करावयाच्या कार्यवाहीबाबत उपस्थित विभाग प्रमुखांना सविस्तर माहिती दिली. या बैठकीत ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करावयाच्या कार्यपध्दतीचे ध्वनीचित्रफितीद्वारे प्रबोधन करण्यात आले. या बैठकीला विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply