अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याला शनिवारी (दि. 27) सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे सावित्री, कुंडलिका, अंबा, उल्हास, पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड, रोहा, नागोठणे, कर्जत या शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. रस्ते रेल्वे, वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
पावसामुळे सावित्री नदीचे पाणी महाड शहरात घुसले. कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडल्याने रोहे शहराच्या काही भागांत पाणी शिरले. रोहा-अष्टमी पुलावरून पाणी वाहत होते. अंबा नदीचे पाणी नागोठणे शहरात घुसले. पाताळगंगा नदीचे पाणी आपट्याजवळ रस्त्यावर आल्याने तेथील वाहतूक बंद पडली होती. याशिवाय पेणची भोगावती, माणगावची काळ या नद्या दुथडी भरून वाहत होत्या.
पोलादपूर तालुक्यातील माटवण येथील मोरीवरून सावित्री नदीच्या पुराचे पाणी वाहू लागल्याने सवाद, धारवली, वावे, हावरे, कालवली गावांचा संपर्क तटला होता. कर्जत तालुक्यातील सोलनपाडा पाझर तलाव भरून वाहू लागल्याने या परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
रायगडात पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
अलिबाग 118, पेण 400, मुरूड 145, पनवेल 240.20, उरण 85.50, कर्जत 265.60, खालापूर 244, माणगाव 200, रोहा 241, सुधागड 186.00, तळा 224, महाड 198, पोलादपूर 209, म्हसळा 130, श्रीवर्धन 90, माथेरान 437.20. एकूण 3413.50. सरासरी 213.34.