Breaking News

गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र नको

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नागरिकांना होणार्‍या मनस्तापाचा विचार करून खारघरमधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी देऊ नये, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खारघर सेक्टर 12मधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी न देण्याबाबत नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांना पत्र दिले होते. त्या अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना कार्यवाहीसाठी निवेदन दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षी गोखले शाळेमध्ये कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र सुरू केले होते. त्या वेळी येथील स्थानिक नागरिकांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागला होता. कैद्यांना भेटायला येणारे नातेवाईक, कैद्यांना येथे आणून सोडून जाणारे पोलीस कर्मचारी, कायदेशीर सल्ला देणारे वकील या सर्वांची होणारी गर्दी व त्यांच्या वाहन पार्किंगमुळे होणारा वाहतूक अडथळा या सर्व कारणांमुळे येथे नेहमीच छोटे मोठे वाद झाले आहेत. या सर्वांचा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मागच्या वेळची स्थिती वेगळी असल्याने नागरिकांकडून सहकार्य मिळाले होते, परंतु या वेळची परिस्थिती वेगळी आहे. मागील महिन्यापासून कोविडबाधितांच्या संख्येत भयावह वाढ होत आहे. त्यात ही शाळा गर्दीच्या व मध्यवर्ती वसाहतीत स्थित आहे.
त्यामुळे परिसरातील वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या संसर्गात आणखी भर पडण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. या विलगीकरण केंद्रात छोटे मोठे कैदी ठेवले जातात. भविष्यात येथे गंभीर घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तरी या विषयाचा गांभीर्याने विचार करून गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र सुरू करू नये, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply