कामोठे : रामप्रहर वृत्त
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कामोठे सेक्टर 11 येथील नालंदा बुद्धविहारात दृष्टी फाऊंडेशन आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका विद्या गायकवाड यांच्या वतीने महिलांकरिता कागदी पिशव्या निर्मिती उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा मोफत घेण्यात आली. या उपक्रमास प्रतिसाद लाभला.
प्रारंभी गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर महिलांकरिता कागदी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा सुरू करण्यात आली. या कार्यशाळेत विविध प्रकारच्या कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कच्चा माल, विक्री व्यवस्थापन, नफा, शासकीय कर्ज योजना या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणानंतर सर्व महिलांना नगरसेविका विद्या गायकवाड, दृष्टी फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर देवधेकर व नम्रता देवधेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.