Breaking News

पुलवामा हल्ल्यामागे पाकच; ‘एनआयए’कडे कटाचे भक्कम पुरावे

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणार्‍या अतिरेक्याचे नाव असून तो मार्च 2018मध्ये जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. एनआयए लवकरच या संपूर्ण कटाचा उलगडा करेल. हाती लागलेल्या पुराव्यांवरून जैश-ए-मोहम्मदचे चार ते पाच जण या कटात सहभागी असल्याचे संकेत मिळत आहेत. सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडक देण्यासाठी ज्या मारुती इको गाडीचा वापर करण्यात आला, त्या गाडीच्या मालकाची ओळख पटवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये आठ वर्षांपूर्वी या मारुती इको गाडीची नोंदणी करण्यात आली होती. मालकाच्या संमतीने या गाडीचा स्फोटासाठी वापर करण्यात आला. या कारचा मालक फरार झाला आहे. पाकिस्तान या हल्ल्यामध्ये सहभागी असल्याचे ठळकपणे दिसत आहे. स्फोट घडवण्यासाठी कंटेनरमध्ये 25 किलो आरडीएक्स ठेवण्यात आले होते. जैशच्या दहशतवाद्यांना इतके आरडीएक्स कसे मिळवले हे तपास यंत्रणांना शोधून काढावे लागेल. मागच्या वर्षी मार्च महिन्यात बेपत्ता झाल्यापासून आदिल अहमद दार जैश-ए-मोहम्मदसाठी काम करत होता. सुरक्षा दलांनी आदिलचे घर जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्या मनात सीआरपीएफबद्दल राग धुमसत होता. सुरक्षा दलांनी रात्रीच्या सुमारास काकापोरा येथे राहणारा आमचा सहकारी आदिल अहमद दारचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हे लज्जास्पद कृत्य असून जम्मू-काश्मीरमधला प्रत्येक लष्करी तळाला लक्ष्य करून जाळून टाकू, असे जैशच्या प्रवक्त्याने म्हटले होते. आदिलच्या मनातील हा राग आणि द्वेष हेरुन जैशच्या स्थानिक हँडलरने त्याचे ब्रेन वॉश केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीमेपलीकडून सूचना मिळाल्यानंतर त्याला सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ल्यासाठी तयार केल्याचा निष्कर्ष तपासकर्त्यांकडून काढण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये आणखी कोण सहभागी होते याची माहिती देण्यास मात्र एनआयएने सध्या नकार दिला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply