पनवेल : वार्ताहर
तळोजा एमआयडीसी परिसरात होत असलेल्या प्रदूषणामुळे भाजीपाला शेती व मासेमारी व्यवसाय धोक्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिकांची परवड होत आहे. तळोजा एमआयडीसीतील कारखान्यांचे सांडपाणी रात्रीच्या वेळी कासाडी नदीत सोडण्यात येत असल्यामुळे ही नदी दूषित झाली आहे. त्याचा परिणाम भाजीपाला शेतीवर व मासेमारी व्यवसायावर प्रामुख्याने झालेला आहे. परिणामी भाजीपाला व मासेमारी व्यवसाय करणार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तळोजा एमआयडीसीतील कानपोली, देवीचापाडा, घोट, तोंडरे, ढोंगर्याचा पाडा, खेरणे, शिरवली, कुत्तारपाडा, महोदर या गावातील भाजीपाला व्यवसाय हा जवळजवळ संपत आलेला आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये असलेल्या कारखान्यांतून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण केले जाते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे कासाडी नदीचे रूपांतर नाल्यात झाल्यासारखे वाटते. आजच्या घडीला ही नदी शेवटची घटका मोजत आहे. कासाडी नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे भाजीपाला व्यवसाय या ठिकाणी आपोआप बंद होत चालला आहे. नदीचे पाणी हे दूषित असल्यामुळे भाजीचे पीक घेण्यास ते मारक ठरत आहे. भाजीपाल्याबरोबरच मासेमारी व्यवसायही जवळपास संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे या परिसरातील कोळी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने या नदीकडे लक्ष देऊन तिला पुनर्जीवित करावे, अशी मागणी या परिसरातील लोक करीत आहेत.