बर्न (स्विर्त्झलँड) : वृत्तसंस्था
भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरातीने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत एक फेरीआधीच बाएल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे.
अनोख्या पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आठ स्पर्धकांना क्लासिकल पद्धतीच्या सात फेर्या, जलद बुद्धिबळाच्या सात फेर्या आणि ब्लिट्झ पद्धतीच्या 14 फेर्या खेळावयाच्या होत्या. क्लासिकल फेरी जिंकणार्याला तीन गुण, जलद प्रकारात दोन आणि ब्लिट्झसाठी एक गुण असे एकूण 49 गुण मिळवण्याची संधी होती. विदितने ब्लिट्झ प्रकारात 14 पैकी 11 गुणांची कमाई करीत अप्रतिम सुरुवात केली होती. त्यानंतर जलद प्रकारात त्याने आठ गुण पटकावले होते. मग क्लासिकल प्रकारात जॉर्ज कोरी, पीटर लेको व सेबॅस्टियन बोंगेर यांच्यावर विजय मिळवत शांखलँड, निको जॉर्जियाडिस आणि नोडिरबेक अब्दुसात्तोरोव्ह यांच्याविरुद्धच्या लढती बरोबरीत सोडवल्या होत्या.