नवी दिल्ली : वृत्तसंस्था केवळ काही मतांसाठी काँग्रेसने मुद्दामहून हिंदू दहशतवाद या संकल्पनेचा वापर केला. वास्तविक, असे कधी काही अस्तित्वातच नव्हते, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केवळ काही मतांसाठी काँग्रेसने मुद्दामहून हिंदू दहशतवाद या संकल्पनेचा वापर केला. वास्तविक, असे कधी काही अस्तित्वातच नव्हते, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असीमानंद यांची एनआयएच्या विशेष कोर्टाने निर्दोष मुक्तता केली असून, या प्रकरणाचा आधार घेत अरुण जेटलींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
18 एप्रिल 2007 रोजी भारत-पाकिस्तानला जोडणार्या समझोता एक्स्प्रेसमध्ये पानिपतजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 68 लोक ठार झाले होते. याप्रकरणी संघाचे प्रचारक असीमानंद यांना प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी या तिघांना अटक करण्यात आली, पण 20 मार्चला पुरावे आणि साक्षीदारांअभावी एनआयएच्या विशेष कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याच मुद्द्यावरून अरुण जेटलींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसने हिंदू दहशतवाद नावाचा कट रचला होता. तथ्यांकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. पुरावे कधी कोर्टासमोर आलेच नाही. हिंदू दहशतवादाची थिअरी तयार करण्यात आली. या स्फोटात जे मेले ते सामान्य लोक होते. या सगळ्याची जबाबदारी काँग्रेस आणि यूपीए सरकारलाच घ्यावी लागेल, असे जेटली म्हणाले. समझोता एक्स्प्रेसप्रकरणी 20 मार्चला एनआयए कोर्टाने निकाल दिला आहे. फक्त संशयाच्या आधारे कोणाला शिक्षा देता येणार नाही, असे मत कोर्टाने व्यक्त केले असून, तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत.