काही व्यक्तींचे व्यक्तिमत्त्वच प्रभावी असतं. डायनॅमिक पर्सनॅलिटी असं म्हणतात. ही माणसं परिसासारखी असतात. संपर्कात येणार्या माणसांचं सोनं करतात. सोन्यासारख्या संधी उपलब्ध करून देतात, असेच आहेत आमचे पनवेलचे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर. विनम्र, विनयशील आणि तेवढेच तडफदार व्यक्तिमत्त्व. खर्या अर्थाने अष्टावधानी नेता.़ विविध कामांसाठी त्यांच्या संपर्कात येण्याचा प्रसंग आला़ प्रत्येक वेळी त्यांच्या स्वभावाचा प्रत्यय येतो. आपण ज्या विषयाबद्दल चर्चा करणार असतो़, त्या विषयाची त्यांना माहिती, जाण आधीपासूनच असते. मग तो विषय धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेबद्दल असेल किंवा नाट्य, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्राबद्दल असेल.
आज मी आपणास नाट्य परिषदेच्या शाखेची स्थापना व शाखेची वाटचाल याबद्दल माहिती देत आहे. पूर्व परंपरागत सुरू असलेली मराठी नाट्य चळवळ संपूर्ण भारतात वाढविण्याचे़, जोपासण्याचे, तसेच त्यामध्ये वेळोवेळी येणारी स्थित्यंतरे समर्थपणे पेलण्याचे आणि त्यामध्ये नित्य नूतन वृद्धिंगत करण्याचे काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई ही मध्यवर्ती संस्था करीत असते. मराठी रंगभूमीची शतकोत्तराची नाट्य परंपरा जोपासण्याचे व वाढ करण्याचे काम या मध्यवर्ती संघटनेकडून सुरू आहे.
मराठी रंगभूमीची ही तेजस्वी परंपरा तेवत ठेवण्यासाठी अनेक नाट्यरसिकांनी व रंगभूमीच्या सेवकांनी निरंतर प्रयत्न केले आहेत. आपल्या पनवेलमध्येही हा वारसा बर्याच वर्षांपासून जपला गेला आहे. मराठी रंगभूमीच्या विकासासाठी पनवेलकरांनीही मनापासून प्रयत्न केले आहेत. युवा नेते परेशजी ठाकूर यांच्या कुशल नेतृत्वाखाली पनवेलमध्ये ‘मल्हार करंडक’ या नावाने जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धा होत होत्या. सर्वश्री अभिजित जाधव, अमोल खेर, शैलेश कठापूरकर, अॅड. चेतन जाधव आणि सत्यवान नाईक या तरुण सहकार्यांसह परेशजी या स्पर्धांचे नेटके आयोजन करीत होते. पनवेलमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा असावी, असा पनवेलकरांचा खास आग्रह होता. येथील हौशी रंगकर्मी, रंगभूमी तंत्रज्ञ व नाट्यरसिकांच्या आग्रहातूऩ पनवेलच नव्हे तर रायगडच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव धडपडणारे आदरणीय माजी खासदार लोकनेते रामशेठजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेची मुहधर्तमेढ चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला 23 मार्च 2012 रोजी रोवली.
माणसाचा आणि समाजाचासुद्धा वर्तमान जसा भविष्याशी तसाच, पण काहीसा जास्तच भूतकाळाशी जोडलेला असतो. वर्तमानातील उभारणीसाठी भूतकाळातल्या संचितातल्या काही व्यक्ती, संस्था उपयोगी पडतील याचा विवेकी विचार जसा माणूस करतो तसाच तो विचार जाणता समाजदेखील करीत असतो. आमदार प्रशांत ठाकूर यांनी हाच विचार करून या शाखेचे उपाध्यक्षपद युवा नेते परेशजींना दिले. त्याचबरोबर अमोल खेर, अभिजित जाधव, सत्यवान नाईक, अॅड. चेतन जाधव, शैलेश कठापूरकर, शामनाथ पुंडे़, स्मिता गांधी या सर्व सहकार्यांचा समावेश करून शाखेची सुरुवात केली.
नाट्य परिषदेच्या शाखेच्या माध्यमातून पनवेल व सभोवतालच्या परिसरामध्ये मराठी रंगभूमीच्या विकासासाठी आवश्यक असणार्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. स्थानिक नाट्य कलावंतांना त्यांचे नाट्याविष्कार सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या शाखेमार्फत दरवर्षी आषाढस्य प्रथमः दिवसे अर्थात कवी कुलगुरू कालिदास दिनाच्या औचित्याने स्वरचित कवितांच्या सादरीकरणाची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेच्या परीक्षणाच्या निमित्ताने पनवेलकर रसिकांना गणेश अचवल़, अरुण म्हात्रे, स्मिता सहस्त्रबुद्धे, गझलनवाज ए. के. शेख, सुजाता पाटील, ज्योत्स्ना राजपूत या कवींच्या कवितांच्या सादरीकरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. आपल्या पनवेलचे नाव ज्या कलावंतांनी सिने, नाट्यक्षेत्रात उंचावलेले आहे अशा कलावंतांचा शाखेच्या वतीने सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले जाते.
शाखेतर्फे दरवर्षी माननीय माजी खासदार लोकनेते रामशेठजी ठाकूर यांच्या वाढदिवशी समाजाच्या प्रबोधनात्मक मनोरंजनासाठी एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रख्यात कवी, प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी ज्ञानेश्वरीच्या पसायदानावर अतिशय रसाळ वाणीत निरूपणाचा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम सुचविला होता आमदार साहेबांनी. रोज हजारो लोक हजारो विषय त्यांच्याकडे मांडत असतात. त्यातून विविध पदाधिकारी़, अधिकारी हेसुद्धा वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा करीत असतात. एक सृजनशील समाज घडवण्याचे त्यांचे हे कार्य अविरत सुरू असते.राजकारणाच्या व समाजकारणाच्या या धबाडग्यातून त्यांची अध्यात्मिक आणि कलेविषयीची आवड ते आवर्जून जोपासतात. असाच एक सुंदर कार्यक्रम गेल्या वर्षीच त्यांनी सुचविला होता तो म्हणजे बाबूजींच्या अर्थात सुधीर फडके यांच्या आणि आधुनिक वाल्मिकी गीतरामायणकर्ते ‘गदीमा’ जन्मशताब्दी वर्ष सुरू होण्याअगोदरच ग. दी. माडगुळकरांनी ओघवत्या वाणीतले शब्दबद्ध केलेले गीतरामायण आणि सादरकर्ते प्रत्यक्ष श्रीधरजी फडके, ज्योतीने तेजाची आरती असे आणि विविध उपक्रम शाखेच्या माध्यमातून घेतले जातात.
आणि अखेर तो दिवस उजाडला. पाडगावकरांच्या शब्दांत सांगायचे तर जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी. पनवेल परिसरच नव्हे, तर बहुतांशी रायगडवासी त्याची मनापासून वाट पाहत होते त्या सर्व सुखसोयींनी अद्यावत असलेले आणि पनवेलच्या वास्तू वैभवात भर टाकणार्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे 2 जून 2014 रोजी थाटामाटात लोकार्पण झाले. पनवेलच्या नाट्यरसिकांना आनंदाचे कवाड उघडून मिळाले. अशा वेळी नाट्य परिषदेचे कार्यकर्ते शांत राहतील ते कसे. प्रशांतदादांशी चर्चा करून रायगड जिल्हा स्तरावरील एकांकिका स्पर्धा राज्य पातळीवरील स्पर्धा करावी असे आम्हा सर्वांना वाटत होते, पण या दूरदृष्टीच्या नेत्याने सबुरीचा सल्ला दिला. टप्प्याटप्प्याने स्पर्धा मोठी करा, असे त्यांनी सांगितले. याचदरम्यान आणखी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. महाराष्ट्र राज्य भाजप सांस्कृतिक सेलचे काही पदाधिकारी आमदारसाहेबांना भेटले व त्यांनी कोकणस्तरीय एकांकिका स्पर्धा घ्यावी, असे सुचविले. पनवेलच्या सुप्रसिद्ध सिनेनाट्य निर्मात्या कल्पना कोठारी यांच्यासमवेत या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि प्रथमच पनवेलच्या नव्याने झालेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. देशाच्या एकंदरीत विकासाबरोबरच सांस्कृतिक विकासासाठी सदैव धडपडणारे ज्येष्ठ कविवर्य, भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांचा विचार वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याच्या संचितामधून प्राप्त झालेला विचारांचा प्रसार या स्पर्धेच्या माध्यमातून करण्याच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे नाव ‘अटल करंडक’ असे ठरविण्यात आले.
दूरदृष्टीच्या नाट्य परिषदेच्या आमच्या अध्यक्षांनी पुढील स्पर्धेसाठी प्रत्येक वर्षी दोन-दोन जिल्हे वाढवायचे, ज्या जिल्ह्यात चांगला प्रतिसाद व चांगले संघ भाग घेत असतील, तर असे जिल्हे ताबडतोब समाविष्ट करून अटल करंडक ही स्पर्धा हळूहळू राज्यस्तरीयचे स्वरूप घेऊन आताच नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, इकडे कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा ही स्पर्धा केंद्रे असून, जवळजवळ नागपूर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा बोलबाला झाला. आता तर महाराष्ट्रातील नामांकित व प्रमुख स्पर्धांमध्ये आपल्या अटल करंडक या स्पर्धेचे नाव घेतले जाते. मध्यंतरी एका दैनिकात आपल्या स्पर्धेबाबत नेटके नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन, निःपक्षपाती निकाल आणि भरघोस बक्षिसे असलेली महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा असे कौतुकपर परीक्षण झाले होते. सन 2018च्या स्पर्धेनंतर 2019च्या मे-जून महिन्यात अटल करंडक 2019च्या तयारीची बैठक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या कार्यालयात होती. आमदारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती. सर्व पदाधिकारी हजर होते. बजेट वगैरे सर्व तयार केले. विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी नेमले. त्यांना फोनवर संपर्क केला. साधकबाधक चर्चा होऊन सभा सुरू होती. एवढ्यात प्रशांतदादांनी विचारले, समजा औरंगाबाद किंवा लांबून येणार्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले, तर सर्व खर्च जाऊन त्या नाट्यसंस्थेला किती फायदा होईल? आणि त्यांना उत्तेजनात्मक मदत किती होईल? त्यावर चर्चा झाली आणि अचानक दादांनी स्पर्धेच्या प्रथम पारितोषिकाची रक्कम दुप्पट केली आणि त्याच अनुषंगाने पुढील बक्षिसांच्या रोख रकमेत वाढ झाली.
म्हणजे लांबून येणार्या स्पर्धकांना आपण राहायची व जेवणाची दोन दिवसांची सोय करतो. शिवाय त्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी उत्तेजन द्यावे म्हणून बक्षिसाची रोख रक्कम वाढवली. केवढे हे औदार्य आणि केवढे अवधान. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींमधील त्यांची माहिती थक्क करणारी असते. नाट्य परिषदेच्या सर्व टीमला त्यांनी निर्णयक्षमता दिली. तुम्ही निर्णय घ्या. आपल्या स्पर्धेचा नावलौकिक कसा वाढेल याबाबत प्रयत्नशील राहा.
अटल करंडकच्या बक्षीस समारंभात आपण नाट्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार करीत असतो. पहिला सत्कार हा पनवेल शाखेतर्फे होतो. साधारणतः नोव्हेंबरच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात नियोजित अध्यक्षांचे नाव नाट्य परिषद मुंबई जाहीर करत असते आणि आपल्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात असतो. याबाबतसुद्धा दादा आग्रही असतात. त्यांचा योग्य सत्कार, त्यांना सन्मानचिन्ह हे सोनावणेंकडूनच घ्यावे, असा त्यांचा आग्रह असतो. (अंधेरी येथील श्री. सोनावणे हे सन्मानचिन्हांसाठी सबंध भारतात प्रसिद्ध आहेत.)
आजपर्यंत अटल करंडक या स्पर्धेच्या परीक्षणासाठी राजन ताम्हणे, प्रदीप मुळे, अदिती सारंगधर, जयवंत वाडकर, मिहीर राजडा, समीर खांडेकर, मृणाल चेंबूरकर, भरत सावळे़, गोविंद चव्हाण, योगेश सोमण, दीपक करंजीकर, संतोष पवार यांसारख्या दिग्गज कलावंतांनी आपल्या स्पर्धेचे परीक्षण केले आहे आणि माननीय गंगाराम गव्हाणकर, जयंत सावरकर, किर्तीताई शिलेदार या नाट्य परिषदेच्या माजी नाट्य संमेलनाध्यक्षांनी अटल करंडकच्या बक्षीस समारंभास हजेरी लावली आहे. या वर्षीच्या बक्षीस समारंभास दि ग्रेट रमेशजी सिप्पी हजर होते. शोले, शान, सीता और गीता या अन् अशा अनेक यशस्वी सिनेमांचे निर्माते दिग्दर्शक रमेशजी सिप्पी नाट्य परिषद पनवेल शाखेचे कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई विद्यापीठातील स्टुडंट वेल्फेअरचे संचालक सुनील पाटील सर यांच्या विशेष आग्रहामुळे आपल्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी हजर होते.
प्रशांतदादांनी परिसरामधील कलेच्या उपासकांना, रसिकांना, प्रेक्षकांना मनोरंजनाची व प्रबोधनाची मेजवानीच दिली आहे. सर्व नाट्यरसिक व पनवेल नाट्य परिषदेच्या सर्व पदाधिकार्यांच्या वतीने या गुणग्राहक, अष्टावधानी नेत्याचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करून त्यांच्या उदंड आयुष्यासाठी नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.
-शामनाथ पुंडे, प्रमुख कार्यवाह़, नाट्य परिषद पनवेल तथा नियामक मंडळ सदस्य, नाट्य परिषद़, मुंबई