मोहोपाडा : प्रतिनिधी
सामान्य जनतेबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविताना शासकीय मदतीबरोबर मी व्यक्तीगत देखील देखभाल करीन, असे आश्वासन उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिले.
ज्येष्ठ नागरिक संस्था चौक यांच्यावतीने उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सत्काराचे आयोजन शनिवारी (दि. 18) ज्येष्ठ नागरिक सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आमदार बालदी बोलत होते. ज्येष्ठ नागरिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून आमदार बालदी यांचा सत्कार अध्यक्ष गजानन पारठे यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळ्यात सत्कार नाही, तर आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे, असेही आमदार बालदी यांनी सत्कार स्विकारताना सांगितले. चौक परिसरातील अनेक समस्या असून सूसज्ज रूग्णालय, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांच्या साठी उद्यान, चौक बाजारातील वाहतुक कोंडी, बाजारपेठ मधील रस्ता रुंदीकरण, दुचाकीस्वार यांचे सुसाट जाणे, नाना-नानी पार्कसाठी जमीन उपलब्ध करून दिल्यास पार्क उभे करू या समस्या सोडविण्यासाठी अग्रक्रम देणार असल्याचे आमदार बालदी यांनी आश्वासन दिले आहे. साठ वर्षावरील नागरिकांसाठी दरवर्षी काशी, मथुरा अशी विनामूल्य सहलीचे आयोजन करत असून चौक ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे अशी इच्छा आमदारांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे महामार्गावर घेतलेल्या जागेत हॉस्पिटलमध्ये करणे विचाराधीन असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला माजी आमदार देवेंद्र साटम, ज्येष्ठ नागरिक संस्थचे सचिव गजानन भोंडगे, सदस्य नरेंद्र शहा, सुनिता मानकामे, शैलजा तांडेल, राम हातमोडे, नारायण कापरेकर, हरिभाऊ माळी, सुरेश चौधरी, कृष्णा म्हात्रे, रमेश कोरडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.