नवी मुंबई : बातमीदार
मुंबईत व त्यांनतर ठाणे व नवी मुंबईत कोणतेही काम करून तग धरून असलेला चाकरमानी सध्या कोकणातील वाट धरू लागला आहे. अवैधरित्या प्रवास करीत आहेत. या वेळी वाहतूक विभागाकडून अडवणूक केल्यावर थेट चालत कोकणातील गाव गाठणार्यांची संख्या वाढली आहे. जीव धोक्यात घालून जाणार्यांवर मात्र कारवाईमुळे दुहेरी संक्रांत कोसळत आहे. त्यामुळे या चाकरमान्यांची मुळ गावी जाण्यासाठी राज्य शासनाने व्यवस्था करावी अशी मागणी
होत आहे.
मुंबईतून अनेक बसेस कोकणात जाण्यासाठी सूटत असल्या तरी 22 जणांचा गट करण्याची शासनाने टाकलेली अट त्यात आडवी येऊ लागली आहे. त्यामुळे अवैधरित्या टेम्पो, जीप अथवा छोटा हातीसारखी वाहने भरून मराठी कुटुंबीय आपले कोकणातील गाव गाठू लागले आहेत. यात नवी मुंबईतील देखील कुटुंबीयांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे याधीच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला आहे. तर आता नवी मुंबईतून देखील कोकणी माणूस बाहेर जाऊ
लागला आहे.
सध्या उद्योग थांबल्याने व घर काम करणार्या महिलांना देखील काम उरले नसल्याने भाडे देण्याची ऐपत राहिली नसल्याने आपले गाव बरे असेच काहीसे म्हणत काहीसे गाव गाठू लागले आहेत. मात्र या कोकणातील नागरिकांवर आता वेगळीच संक्रांत येऊ लागली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातून येणार्या मराठी कुटुंबीयांना वाली कोण? असा प्रश्न उभा राहिला आहे.
जर कोणी अवैधरित्या प्रवास करत असेल तर ते चुकीचे आहे. नियमानुसार त्यावर कारवाई केली जात आहे. त्यांना पुन्हा आपल्या घरी सोडण्यासाठी व्यवस्था केली जाईल.
– शेखर चन्ने, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र शासन