Breaking News

कोंडरान गावाजवळ झालेल्या भूस्खलनाने ; शेतीचे नुकसान; 48 जनावरे दगावली

महाड : प्रतिनिधी

तालुक्यात गेली दोन आठवडे मुसळधार पाऊस होत होता. मात्र 6 ऑगस्ट रोजी किल्ले रायगड परिसरात झालेल्या अतिवृष्टीने जागोजागी भूस्खलन झाले आहे. त्याचे भयाण रूप कोंडरान आणि कोंझर गावादरम्यान दिसून येत आहे. याठिकाणी आलेल्या मातीने शेकडो एकर भात शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण शेत जमिनीत माती, झाडांच्या फांद्या, दिसून येत आहेत. तर नदी लगतची जवळपास तीन हजार हेक्टर भातशेती कुजून गेली आहे. यावेळी झालेल्या पुरामुळे 20 शेतकर्‍यांची 48 जनावरे दगावली आहेत, तर अनेक जनावरे आजाराने ग्रस्त आहेत.

महाड तालुक्यातील किल्ले रायगड परिसरात 6 ऑगस्ट रोजी  अतिवृष्टी झाली. रायगड, वाळण आणि वरंध विभागात सहा तासात जवळपास 380 मिमी पाऊस कोसळला. या अतिवृष्टीने गांधारी, काळ आणि सावित्री नद्यांना महापूर आला आणि महाड शहराला पुराने वेढले. मात्र किल्ले रायगड परिसरात जागोजागी भूस्खलन झाल्याचे दिसून येत आहे. कोंझर गावापासून किल्ले रायगड दरम्यान असलेल्या घाटात जागोजागी छोट्या मोठ्या दरडी आल्या आहेत. मात्र कोंझर गावापासून सुमारे तीन किमी अंतरावर असलेल्या कोंडरान गावाकडे जाणार्‍या रस्त्यालगत असलेल्या शेतात डोंगरातून आलेल्या पावसाच्या पाण्याने मूळ मार्ग बदलत शेजारील माती आणि त्यावरील झाडांचे तुकडे तुकडे केले. डोंगर भागातून आलेल्या मातीने कोंडरान रस्त्यालगत असलेल्या शेकडो एकर भात शेतात दीड ते दोन फुटाचा माती भराव तयार झाला आहे. डोंगरातील झाडांच्या, फांद्या, साली, लाकडांचे तुकडे याभागात अडकून पडले आहेत.

कोंझर गावातील गणपत रघुनाथ पवार, संजय अंबाजी पवार, शंकर बाळू सकपाळ, बाबू घोलप, विजय मगर यांची ही भात शेती असून, त्यातील भात रोपे नष्ट झाली आहेत. पाण्याच्या प्रचंड वेगाने भात रोपे वाहून गेली आहेत. त्यातच भात जमिनीत आलेला चिखल सुमारे दीड फुटाचा असल्याने पाय टाकणेदेखील शक्य होत नसल्याचे स्थानिक ग्रामस्थ अनंत पवार यांनी सांगितले. 6 ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता या रस्त्यावर किमान कमरेइतके होते, असे नामदेव जाधव यांनी सांगितले.

या भूस्खलाने भात जमिनीची पुन्हा मशागत करणे या  आवाक्या बाहेरचे आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामादेखील आठवडा होत आला तरी अद्याप केला गेलेला नाही. भात शेतीचे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ आल्याचे गणपत पवार यांनी सांगितले. 

गांधारी आणि सावित्री नदी किनारी असलेल्या भात शेतीमध्ये दहा दिवसापासून पूराचे पाणी साचल्यामुळे या भागातील जवळपास तीस हजार हेक्टर भात शेती कुजून गेली असून शेतकर्‍यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील 20 शेतकर्‍यांच्या सहा गाई, 14 म्हसी, एक बैल, 10 बोकड, 17 शेळ्या तर शेकडो कोंबड्या दगावल्या आहेत. हजारो जनावरे साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत. मात्र अद्याप तालुक्यात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply