खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
समोरून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने हुलकावणी दिल्याने एसटी बसचालकाने तत्काळ ब्रेक दाबला. त्यामुळे बस रस्त्यावरून घसरून अपघात झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी वांवढळ (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत कमल हॉटेलजवळ घडली. सुदैवाने त्यात कोणीही जखमी
झाले नाही.
ही बस (एमएच-14,बीएल-9389) मंगळवारी सकाळी मुंबई सेंट्रल येथून पंढरपूरला जात होती. बसमध्ये वाहक-चालकासह 28 प्रवासी होेते. मुंबई-पुणे महामार्गावरील वांवढळ गावानजीक असलेल्या कमल हॉटेलजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने बसला हुलकावणी दिली. चालक प्रवीण कोल्हे यांनी प्रसंगावधान दाखवून तत्काळ ब्रेक दाबला. त्यामुळे एसटी रस्त्यावरून घसरत बाजूपट्टीवरून गटारात कलंडली. सुदैवाने एसटी पलटी न झाल्याने मोठा अपघात टळला. अपघातप्रसंगी बाहेर पडण्याच्या एसटीच्या मागील दरवाजातून प्रवाशांनी स्वतःची सुटका करून घेतली.
घटनेचे वृत्त समजताच खालापूर पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना धीर दिला. महामंडळाचे माइक बांगर व कर्जत आगाराच्या कर्मचार्यांनी अपघातग्रस्त प्रवाशांना दुसर्या गाडीने पंढरपूरकडे रवाना केले.