‘दीवार’ म्हणताच अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येतात… ते माझे शालेय वय. सत्तरच्या दशकात सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहावरील नवीन चित्रपटाचे डेकोरेशन पाह्यच्या अलिखित संस्कृतीनुसार मिनर्व्हा थिएटरवरचे दीवारच्या पोस्टर डिझाईनवरील शर्टाला गाठ घालून नजरेत खुन्नस भरलेला अमिताभचा भला मोठा कटआऊट, शशी कपूरचे पोलीस इन्स्पेक्टरचे रुपडे, निरुपा रॉयला मिळालेले मोठे स्थान हे सगळेच दिसत होते. मिनर्व्हावर पोस्टर डिझाईनला स्कोप भरपूर. पिक्चरचा जणू एक प्रकारचा ट्रेलर. हा दिवस होता, 24 जानेवारी 1975. चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखील.
आदल्याच दिवशी मुंबईच्या अगदी नवीनच अशा वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील त्या मालिकेतील पाचवा कसोटी सामना सुरू झालेला. या स्टेडियममधील हा पहिलाच कसोटी क्रिकेट सामना. त्यालाही पन्नास वर्ष पूर्ण.
चित्रपटाच्या पोस्टरवर आणि थिएटर डेकोरेशनवर चित्रपटातील आईला महत्त्वाचे स्थान दिलेले आणि पटकन आठवणारे दोन हिंदी चित्रपट, मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया (1957)मधील अतिशय करारी मां राधा (नर्गिस) आणि यश चोप्रा दिग्दर्शित दीवार (1975)मधील अशीच आदर्शवादाचा रस्ता चुकलेल्या मुलाविरुध्द ठामपणे उभी राहिलेली मां (निरुपा रॉय)
दीवारच्या पटकथेत याच ’मदर इंडिया’ची आई आणि नितीन बोस दिग्दर्शित गंगा जमुना (1961)मधील भिन्न स्वभावाचे, प्रवृत्तीचे भाऊ या तीन व्यक्तिरेखांमधील भावनिक नाट्य पाह्यला मिळते… खुद्द पटकथा व संवाद लेखक सलिम जावेद यांनीच ही गोष्ट अनेकदा सांगितलीय. ते करताना त्यांनी अनेक गोष्टींसह त्यात आपले लेखनाचे कसब, कौशल्य दाखवले. मूळ ग्रामीण भागातील या गोष्टी सत्तरच्या दशकातील शहरी भागात घडवल्या हा वरकरणी बदल झाला. त्यांनी आपणच लिहिलेल्या प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीर (1973)मधील अमिताभ बच्चनच्या सूडनायक (अॅन्ग्री यंग मॅन)ची अभिनय क्षमता आणि सत्तरच्या दशकातील बदलता चित्रपट आणि त्याचे रसिक प्रेक्षक यांचे भान ठेवले. या सगळ्यातून त्यांनी दीवार लिहिला…
गुलशन रॉय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित दीवार निर्मितीमागे अनेक रंजक घडामोडी आहेत. एक व्यावसायिक चित्रपट निर्माण होताना पडद्यामागे बरेच काही घडत बिघडत असते हे जाणून घेणे हादेखील चित्रपट अभ्यासाचाच भाग.
अमिताभ बच्चनलाच डोळ्यासमोर ठेवून सलिम जावेद यांनी दीवार लिहिला. त्याच सुमारास यश चोप्रा यांचे बंधु धरम चोप्रा यशराज फिल्मसाठी ’गर्दीश’ नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत होते. त्यात अमिताभ, नीतू सिंग व परवीन बाबी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याच चित्रपटाच्या सेटवर सलिम जावेद यांनी अमिताभला ’दीवार’चे कथासूत्र ऐकवले. ते त्याला आवडले, पण यश चोप्रा यांना सलिम जावेद यांनी याच पटकथेची सांगितलेली किंमत फारच वाटली. तरी त्यांनी निर्माते गुलशन रॉय यांच्या त्रिमूर्ती फिल्म या बॅनरखाली दीवार बनवायचा विचार केला आणि हे दोघे, यशजींचा सहाय्यक रमेश तलवार आणि सलिम जावेद अशी एक स्टोरी सिटींग ठरवली. (यशजींचा ’दाग’ गुलशन रॉय यांच्या मॉडर्न मुव्हीज या वितरणने प्रदर्शित केला. याच गुलशन रॉय यांच्या निर्मिती संस्था त्रिमूर्ती फिल्मसाठी यशजींनी ’जोशीला’ दिग्दर्शित केला. हे दोन्ही चित्रपट 1973 साली प्रदर्शित झाले.) गुलशन रॉय यांनी स्टोरी ऐकली आणि विजयच्या भूमिकेसाठी राजेश खन्ना असेल असे म्हटले. त्याच्या सुपर स्टार यशाचा तो काळ होता आणि गुलशन रॉय यांनी त्याला करारबद्धही केला होता. सलिम जावेद मात्र अमिताभच्याच नावावर ठाम राहिले. राजेश खन्नासाठी वेगळी पटकथा देतो म्हणाले. विजयचा धाकटा भाऊ रविच्या भूमिकेसाठी नवीन निश्चलला विचारले. त्याने आपण ज्योती स्वरुप दिग्दर्शित ’परवाना’ (1971)मध्ये नायक असताना अमिताभ व्हीलन होता. आता आपण दुय्यम भूमिका का साकारु असे म्हणतच नकार दिला. शत्रुघ्न सिन्हाने अगोदरच राजेश खन्नाचा छोटा भाऊ साकारण्यास नकार दिलेला. यश चोप्राना शशी कपूरने होकार देताना प्रश्न केला, मी अमिताभचा लहान भाऊ म्हणून कसा शोभणार? यशजींनी त्याला विश्वास दिला की ती जबाबदारी माझी… आईच्या भूमिकेसाठी वैजयंतीमालाला विचारण्यासाठी गुलशन रॉय व यश चोप्रा चेन्नईला (तेव्हाचे मद्रास) गेले. तिने आपल्या चित्रपट क्षेत्रातील निवृत्तीच्या निर्णयाशी ठाम राह्यचे ठरवले. निरुपा रॉयच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. एव्हाना ’गर्दीश’ चित्रपट मध्येच बंद झाल्यावर नीतू सिंग व परवीन बाबी ’दीवार’साठी निश्चित झाल्या.
अन्य कलाकार निश्चित होत होत 21 मार्च 1974 रोजी परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत दीवारचा मुहूर्त झाला (यशजींच्या यशराज फिल्मचे कार्यालय राजकमल स्टुडिओत होते) चित्रपती व्ही.शांताराम, विजय आनंद यांच्या खास उपस्थितीत दीवारचा मुहूर्त झाला, पण यावेळेस शशी कपूर नव्हता, पण का? त्याच दिवशी तो शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेला होता. आपले चित्रपट यशस्वी व्हावेत असा त्याला आशीर्वाद हवा होता. (18 मार्च रोजी त्याची भूमिका असलेला अशोक रॉय दिग्दर्शित ’चोर मचाये शोर’ प्रदर्शित होत होता. आणि त्याने शिर्डीला जावे असा सल्ला त्याला मनोजकुमारने ’रोटी कपडा और मकान’च्या सेटवर दिला होता. एका चित्रपटामागे किती व कशा रंजक गोष्टी घडताहेत याचे उत्तम उदाहरण)
अमिताभ एकाच वेळेस बंगलोरजवळील रामगढ येथील रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शोले’ (अर्थात 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित)चे दिवसभर शूटिंग करून संध्याकाळच्या विमानाने मुंबईत येऊन ’दीवार’चे शूटिंग करून सकाळीच विमानाने बंगलोरला जाई. खुद्द अमिताभनेच कौन बनेगा करोडपतीमध्ये ही गोष्ट सांगितलीय. तो विमानात झोप पूर्ण करे.
मूळ पटकथेत गाण्यांना जागा नव्हती. गुलशन रॉय यांना हे मान्य नव्हते. मग पटकथेत गाण्याच्या जागा काढल्या तरी दोन गाणी चित्रीत होऊनही संकलनाच्या टेबलावर कापली. देवेन वर्मा याच्यावरचे इधर का माल उधर आणि मन्ना डेने गायलेले दीवारों का जंगल ही गाणी चित्रपटात नाहीत, पण ग्रामोफोन रेकार्डवर आहेत. अमिताभ व परवीन बाबी यांच्या हॉटेलमधील भेटीच्या वेळच्या बॅकग्राऊंडला असलेल्या आय म फॉलिंग इन लव्ह गाण्यात अमिताभ घड्याळात पाहतो तत्क्षणीचा म्युझिक पंच बेहतरीन.
फर्स्ट शोपासूनच ’दीवार’ सुपरहिट. या चित्रपटातील काही प्रसंग हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित आहेत असेही म्हटले जाते.
पटकथा लेखनाच्या अभ्यासक्रमात ’दीवार’ सर्वोत्तम. चित्रपट अनपेक्षित वळणे घेत घेत रंगतो. यातील अनेक गोष्टी पन्नास वर्षांपूर्वीच्या चित्रपटात विशेष उल्लेखनीय होत्या. विजयच्या वडिलांवर (सत्येन कप्पू) चोरीचा आळ येतो आणि त्या रागातून सहकारी कामगार विजयच्या हातावर गोंदवतात, मेरा बाप चोर है… विजय मोठा झाल्यावर मृत पित्याला अग्नि देताना हातावरचे शर्ट थोडे वर सरकते आणि तेच गोंदवलेले शब्द दिसतात… लहानपणी विजय रस्त्यावर बुट पॉलीशचा व्यवसाय करीत असताना मुल्कराज दावर (इफ्तेखार) त्या कामाचे पैसे त्याच्या अंगावर फेकताच विजय उफाळून म्हणोत, मै फेके हुये पैसे नहीं उठाता… तो मोठा झाल्यावर दावरला याच क्षणाची आठवण देत म्हणतो, आज भी मै फेके हुये पैसे नही उठाता…
दीवारमध्ये मानसिक व्दंव्द बरेच आहे. अतिशय प्रभावी व बोलक्या संवादातून चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवतो. गैरमार्ग हेच जगण्याचा सूत्र असे मानत असलेला आणि गुन्हेगारी विश्वात झपझप वरची पायरी चढत गेलेला विजय आणि त्याचा हाच रस्ता मान्य नसलेला त्याचा भाऊ रवि यांच्या संघर्षांत त्यांच्या आईला म्हणजे सुमित्रा देवी यांना आपल्या मोठ्या मुलाचे न आवडणारे वागणे असा हा संघर्ष. संवादातून चित्रपट जास्त प्रभावी ठरतो.
आज मेरे पास बंगला है, गाडी है, बॅन्क बॅलन्स है, क्या है तुम्हारे पास? मेरे पास मा है… प्रेक्षागृहात कमालीची शांतता, कारण असं काही ऐकायला मिळेल अशी अपेक्षाच नव्हती.
जाओ पहले उस आदमी का साईन लेकर आओ जिसने मेरे बाप को चोर कहा था…फिर तुम जहा कहोंगे मेरे भाई, वहा मै शादी करुंगा… अगदी छोट्या संवादातूनही फार प्रभात दाखवला.
खुश तो बहुत होगे तुम… क्लायमॅक्सला विजय देवाच्या मूर्तीशी बोलतो हा प्रसंग साकारण्यापूर्वी आपण बरीच तयारी केली. दिवसभर तो मेकअप रुममध्ये बसून या दृश्याची/संवादाची तयारी करत होता. मुळात तो आस्तिक आणि त्याला नास्तिक साकारायचा होता. आपल्या आईच्या कुशीत त्याचा मृत्यू होणे हेदेखील दृश्य असेच कसोटीचे. आपण या दृश्याच्या शूटिंगच्या वेळेस बोललेले डायलॉग तसेच ठेवावेत तरच त्यात खर्या भावना उतरतील (डबिंग करु नये असे अमिताभचे म्हणणे होते). असे काही वर्षांपूर्वी अमिताभने सोशल मिडियातील आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले.
दीवारच्या संवादाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित होताच त्याची विक्रमी विक्री झाली. हे डायलॉग ऐकून टाळ्या नि शिट्ट्या वाजवण्यासाठीही अनेकांनी दीवारसाठी पुन्हा पुन्हा चित्रपटगृहाची वारी केली. 786 या बिल्ल्याची भूमिका महत्त्वाची. हा आकडा इस्लाममध्ये पवित्र मानला जातो. के.जी. कोरगावकर यांचे छायाचित्रण आणि टी. आर. मंगेशकर व प्राण मेहरा यांचे संकलन यांचा वाटा खूपच महत्वाचा.
मिनर्व्हात पंचवीस आठवड्यांचा मुक्काम केल्यावर मोती चित्रपटगृहात दीवार प्रदर्शित केला आणि तेथे पन्नासाव्या आठवड्यापर्यंत वाटचाल केली. तेथून लिबर्टी चित्रपटगृहात मॅटीनी शोला चित्रपट शिफ्ट केला आणि शंभराव्या आठवड्यापर्यंत चित्रपटाने मुक्काम केला. सुपरहिट चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्याचे ते दिवस होते. चित्रपटही तसेच पुन्हा पुन्हा पहावेत असे असत.
दीवार चित्रपटगृहातून उतरला तरी त्याचा प्रभाव व अस्तित्व आजही कायम आहे. सलिम जावेद जोडी फुटल्यावर जावेद यांनी जीवन एक संघर्ष (दिग्दर्शक राहुल रवैल) आणि सलिम यांनी नाम (दिग्दर्शक महेश भट्ट), फलक (दिग्दर्शक शशिलाल नायर) हे चित्रपट दीवारचीच एक प्रकारची रिमेक होती, पण हे चित्रपट पूर्णपणे फसले.
दीवार एकदाच पडद्यावर येतो. असे चित्रपट पुन्हा पुन्हा बनत नाहीत आणि ते शक्यही नाही. पन्नास वर्षांनंतरही दीवार एक ताकदवान प्रभावी चित्रपट आहे. डिजिटल मिडियात कुठूनही कधीही कितीही पहावा तोच प्रभाव, तशीच रंजकता. तोच अनुभव तसाच थरार.
आजही माझ्या डोळ्यासमोर मिनर्व्हावरील ’दीवार ’चे डेकोरेशन कायम आहे… दीवारने मिनर्व्हात पंचवीस आठवड्यांचा मुक्काम केल्यावर 15 ऑगस्ट 1975 रोजी शोले प्रदर्शित झाला आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचे नवीन पर्व सुरु झाले. त्यालाही आता पन्नास वर्ष पूर्ण होतील… आणि आता आठवण अमिताभने शर्टाला गाठ मारली त्याची! ते ठरवून केले की स्टाईल म्हणून केले? असे नव्हे तर टेलरने अमिताभचे शर्ट अवाजवी मोठे शिवले. आता करायचे काय? अमिताभ शर्टाला गाठ बांधून यशजींसमोर आला आणि यशजीही ते पाहून इम्प्रेस झाले. आणि ते तसेच ठेवायचे ठरले आणि मग त्या गाठेने अमिताभला
आणखी एक वेगळे रूप दिले.
-दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)