Breaking News

बोरघाट प्रवास नको रे बाबा

 वाहतुकीच्या कोंडीने वाहन चालक वैतागले

खालापूर : अरूण नलावडे

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग सध्या वाहतूक कोंडीचा सामना करीत आहे. द्रुतगती मार्गाने मुंबई-पुण्यामधील अंतर कमी झाले असले तरी बोरघाटातील सावरोली टोलनाका ते अमृतांजन ब्रिजदरम्यान दोन दोन तीन तीन तास वाहनांचा खोळंबा होत असल्याने वाहन चालकांना द्रुतगती मार्गावरील प्रवास नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मुंबई मार्गिकेवर शुक्रवारी संध्याकाळी वाहनांची चार किलोमीटर लांब रांग लागली होती. ही घटना ताजी असतानाच शनिवारी सावरोली टोलनाका परिसरातील पुणे मार्गीकेवर पाच किलोमीटर लांब वाहनांची रांग लागल्याचे चित्र होते. वाहतूक पोलीस, बोरघाट पोलीस व आयआरबी यंत्रणा दक्षपणे काम करीत असतानाही सावरोली टोलनाक्यावर वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे संपूर्ण बोरघाटात वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

याबाबत सावरोली टोल नाक्याचे प्रमुख निलेश मेहेत्रे, बाबासाहेब लांडगे यांनी सांगितले की, सध्या द्रुतगती मार्गावर बोरघाटात चार मार्गिका मिसिंगलिंकचे काम सुरू आहे. कधी ब्लास्टिंगसाठी तर कधी रस्त्यावरील मलबा बाजूला काढण्यासाठी दिवसातून तीन वेळा पंधरा मिनिटांसाठी वाहतूक बंद करण्यात येते. त्यामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढते. आधीच या मार्गावर वाहतुकीचा लोड आहे, त्यातच मिसिंगलिंकचे काम करण्यासाठी एक मार्गिका बंद ठेवली जात असल्याने वाहनांचा खोळंबा होत आहे. शनिवार, रविवार, वीकेण्डला इमॅजिका थीम पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट गेल्या महिनाभरापासून वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गाचा वापर होत आहे. परिणामी या महामार्गावरील वाहनांची संख्या वाढत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

याबाबत बोरघाट सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले, पोलीस कर्मचारी संतोष खाडे, ललित कडू, प्रशांत वर्तक, रूपेश कोंडे यांनी सांगितले की, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि  द्रुतगती मार्गावरील वाहतूक  बोरघाटात एकाच ठिकाणी येत असल्याने अमृतांजन ब्रिज परिसरात वाहनांची संख्या वाढते. त्यामुळे या परिसरात नेहमी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते तसेच दंडात्मक कारवाई करुनही काही वाहन चालक वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत, वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. बोरघाटात भुसुरूंग करतेवेळी 15 मिनिटांच्या अंतरावर वाहतूक रोखली जात आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडी होत आहे. मागील दोन दिवस खोपोली बायपास अफकॉन कंपनीसमोर तीन ठिकाणी रंबळ स्ट्रीपचे काम करण्यासाठी वाहतूक एका मार्गिकेवर वळविण्यात येत आहे.

सावरोली टोलनाक्यावर 27 मार्गिका असून वाहतूक थांबणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. वीकेण्ड, सार्वजनिक सुट्टीला तसेच इमाजीका येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. तसेच बोरघाटात मिसींक लिंकचे काम  व रस्त्यावरील मलबा काढणे यासाठी वाहतूक रोखावी लागते. त्यामुळे बोरघाटात वाहतूक कोंडी होते.

-निलेश मेहेत्रे, टोलनाका प्रमुख, सावरोली, बोरघाट

बोरघाटातील अमृतांजन ब्रिज, आडोशी बोगदा, खोपोली बायपास व अंडापॉईंट या चार ठिकाणी रंबळ स्ट्रीपचे काम करण्यात आले असून अफकॉन कंपनी समोर तीव्र उतारावर रंबळ स्ट्रीपचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

-योगेश भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक

अपघातांची मालिका

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) व अफकॉन कंपनीच्या धोरणामुळे खोपोली बायपास ते ढेकू गाव (किमी 39 ते 42 अंतर) मार्गिका बंद केल्याने गेल्या आठ महिन्यात किमान 13 अपघात झाले. त्यात 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 30 जण जखमी होऊन जायबंदी झाले. 30 वाहनांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये अफकॉन कंपनीचे सहा कामगार रस्त्यावर काम करीत असताना ठार झाले त्यात नवी मुंबई येथील डॉ. आदित्य संजय तनखवळे व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर बँकेचे चार अधिकार्‍यांचा समावेश आहेे. याच कालावधीत सहा वाहने एकमेकांवर अतीवेगात आदळल्याने मुंबईचे तीघेजण  ठार तर तीन प्रवासी जखमी झाले. या अपघाताच्या मालिकेमुळे बोरघाट सहा तास ठप्प झाला होता.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply