बियारित्झ : वृत्तसंस्था
काश्मीर तसेच भारत आणि पाकिस्तानमधील सर्वच मुद्दे हे द्विपक्षीय असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्यासमोर स्पष्ट केले. मोदी आणि ट्रम्प यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीची गरज नाही. ते दोघेही चर्चेने मुद्दे सोडवतील, असेही मोदी म्हणाले. अमेरिकेच्या सर्व सूचनांचे स्वागत असल्याचे मोदींनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान जी-7 परिषदेसाठी फ्रान्समध्ये आहेत. या परिषदेसाठी जी-7 गटाचे सदस्य नसलेल्या काही देशांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. यात भारताचाही समावेश आहे. या परिषदेमध्ये मोदी-ट्रम्प यांच्यात विविध प्रश्नांवर द्विपक्षीय चर्चा झाली आहे.
या चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय आहेत आणि कोणत्याही देशाला यासाठी कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. काश्मीरमधील परिस्थिती आता पूर्ण नियंत्रणात आहे. ट्रम्प यांनीही मोदींच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यांना मोदींवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलं.
मोदी म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान अनेक द्विपक्षीय मुद्दे आहेत. पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानांना मी फोन करून शुभेच्छा देताना सांगितले होते की पाकिस्तानला आरोग्य, गरिबी, शिक्षणाचा अभाव अशा मुद्द्यांवर लढायला हवं. दोन्ही देश मिळून या विरोधात लढूया. दोन्ही देश जनतेच्या भलाईसाठी काम करतील.’
यावर ट्रम्प म्हणाले, ’आम्ही काल रात्री काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी सांगितले की परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. मला आशा आहे की ते चांगलं काम करण्यात यशस्वी होतील. भारत आणि पाकिस्तान समस्येवर एकत्रित तोडगा काढतील.’
मोदी हे अतुलनीय व्यक्तिमत्त्व असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. काश्मीर मुद्द्यावर भारत पाकिस्तानसोबत चर्चा करून मार्ग काढेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या वक्तव्यामुळे पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्याकडे या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. याआधी जुलै महिन्यात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी आपल्याला काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यासाठी सांगितले होते असा दावा केला होता, पण आज ट्रम्प यांनी यावरून यूटर्न घेतला. चीनशिवाय पाकिस्तानला कोणीही समर्थन न केल्याचेही यानिमित्तान स्पष्ट झाले आहे. या गटाच्या सात देशांशिवाय भारत, ऑस्ट्रेलिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, सेनेगल आणि रवांडा या देशांच्या प्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रेडो, जर्मिनीच्या चान्सलर अँजेला मार्केल, जपानचे पंतप्रधान शिंझो आबे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन आणि इतर नेते या परिषदेत आहेत.