Breaking News

संशयास्पद मजकूरप्रकरणी एक जण अटकेत

उरण ः प्रतिनिधी

उरण तालुक्यातील खोपटा पुलाच्या भिंतीवर दहशतवादासंदर्भातील आक्षेपार्ह मजकूर लिहिणार्‍या आरोपीस उरण पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत अटक केली. या प्रकारामुळे उरण तालुक्यासह संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात खळबळ माजली होती. या प्रकरणी खोपटे येथील बांधपाडा येथे राहत असलेला अमीर उल्ला खान (35) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने संशयास्पद मजकूर लिखाण केल्याबाबतची कबुली उरण पोलिसांना दिली आहे.

उरण तालुक्यातील नव्या खोपटा पुलाखालील खांबावर काळ्या रंगाच्या मार्करने दोन ठिकाणी अज्ञातांनी दहशतवादविषयक मजकूर लिहिल्याबाबतची धक्कादायक माहिती 2 जून रोजी उरण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उरण पोलिसांसह नवी मुंबई गुन्हे शाखेची पोलीस पथके व दहशतवादविरोधी पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार स्वतः घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांबरोबर वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीही कामाला लागले होते. उरण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून बांधपाडा येथे राहत असलेला चालक अमीर उल्ला खान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

उरण पोलिसांनी आरोपीविरोधात देशद्रोह, देशविरोधी कारवाया केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून भादंवि 153, 268, 504, 506 कलमान्वये अटक करण्यात आली. आरोपीला उरण येथील कनिष्ठ स्तर न्यायालयासमोर हजर केले असता 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्याने उरणमधील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply