Breaking News

मुरूड-जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांचा ओघ वाढणार

मुरूड-जंजिरा महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावरील एक जलदुर्ग आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. अगदी किल्ला हातात आलाच होता, पण जंजिरा अखेरपर्यंत अजिंक्यच राहिला. सध्या झी मराठीवर छत्रपती संभाजी ही मालिका सुरू आहे. मागील काही भागात जंजिरा किल्ल्याशी संबंधित गोष्टी दाखविल्या जात आहेत. कोंडाजी फर्जंद सध्या जंजिरा किल्ल्यावर आहे. किल्ल्यावरील दारूखान्याची माहिती त्यांनी काढली आहे. आता ती पेटवून देण्याच्या बेतात कोंडाजी आहे, पण हा प्रयत्न यशस्वी होत नाही व कोंडाजीबाबाला तोफेच्या तोंडी दिले जाईल. हा सारा इतिसास संभाजी मालिकेत दाखविला जात असल्याने सध्या सर्वांनाच या किल्ल्याविषयीची उत्सुकता वाढली आहे. पावसामुळे या किल्ल्याकडे जाणारी वाहतूक बंद होती, मात्र मुरूड तालुक्यातील राजपुरी बंदरात असणारा सुप्रसिद्ध इतिहास जंजिरा किल्ल्यास जाण्यासाठी शिडांच्या बोटीची गुरुवार (दि. 29) सुरुवात झाली आहे. वर्षाला पाच लाख पर्यटक या किल्ल्यास भेट देत असतात. आता मात्र ही संख्या दुप्पट होईल, अशी शक्यता आहे. किल्ल्याबरोबरच मुरूडच्या समुद्रकिनार्‍यावरही गर्दी होईल. एकंदरीत मुरूडच्या पर्यटनात यंदा वाढ होईल, असा विश्वास स्थानिकांना वाटतो आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरूड तालुक्यातील मुरूड नावाचे गाव आहे. मुरूडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरूडपासून राजपुरी चार-पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरूड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.

जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरूड-जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलालबांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.

जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्या वेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहात असत. त्या वेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्या वेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेनासा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.

राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.

पुढे पिरमखानाच्या जागी बुर्‍हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुर्‍हाणखानाने बांधलेले आहे. पुढे 1617 मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिर्‍याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिर्‍यावर स्वामित्व मिळवता आले नाही. 1617 ते 1947 अशी 330 वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिर्‍याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुर्‍हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुर्‍हाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका.

या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता, पण तरीही मुरूडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.

जंजिर्‍याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे 19 बुलंद बुरूज आहेत. दोन बुरूजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्‍या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्‍यावर 514 तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.

जंजिर्‍याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्‍यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. 330 वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरूब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल. असा हा अजेय जंजिरा, 20 सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी, म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले. सध्या शिवकाळातील जंजिर्‍याचा इतिहास दाखविला जात असल्याने सर्वांनाच या किल्ल्याविषयी पुन्हा एकदा नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा हा किल्ला पाहण्यासाठी गर्दी होणार आहे.

-संजय करडे, खबरबात

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply