थाटामाटात शिवाजी पार्कवर ज्या सहा-सात जणांनी शपथा घेतल्या, त्या अर्धा डझन लोकांनी सारी मंत्री पदे आपसात वाटून घेतली आहेत. अधिवेशनानंतर रीतसर खातेवाटप होईल असे सांगितले जाते. परंतु हिवाळी अधिवेशनात प्रश्न कोणाला विचारायचे, उत्तरे कोणता मंत्री देणार, एखाद्या विभागाचे उत्तरदायित्व कोणाचे, उत्तरे देणारा मंत्री त्याच खात्याचा मंत्री राहील याची शाश्वती काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. थोडक्यात, आमच्या सरकारला कुठलेच प्रश्न विचारू नका असे सुचवण्यासारखी परिस्थिती आहे.
प्रचंड खटाटोपानंतर सत्तेवर आलेले ठाकरे सरकार सोमवारपासून नागपूर येथे होणार्या हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाणार आहे. हे अधिवेशन आठवडाभराचेच असल्यामुळे नव्या कोर्या सरकारला फारशा पेचप्रसंगांना तोंड द्यावे लागणार नाही असे आधी वाटत होते. मुळात या अधिवेशनाकडे नवे सरकार फारशा गांभीर्याने बघत नव्हते व नाही. नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्याचे घेणे बंधनकारक आहे. मागील सरकारने हा परिपाठ योग्य प्रकारे पाळून उपराजधानी असलेल्या नागपूरचा मान ठेवला. परंतु तीन दिशांना जाणारी तीन चाकी असलेली ठाकरे सरकाररूपी ऑटोरिक्षा नागरूप अधिवेशनापर्यंत पोहोचली हेच खूप झाले. परस्परांतील अंतर्विरोधामुळे आधीच बोजड झालेले हे असंतुलित सरकार पुढे किती पल्ला गाठेल हे सांगता येणे कठीण आहे. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याच्या गमजा मारणारी शिवसेना गेल्या पंधरा दिवसांत साध्या सवलतीची घोषणा करू शकलेली नाही. शेतकर्यांचा कैवार घेणारे सत्तेतील तिन्ही पक्ष कर्जमाफीबाबत सपशेल मूग गिळून बसले आहेत. गेल्या सरकारातील काही विधायक प्रकल्पांना स्थगिती देण्यापलीकडे नव्या सरकारने कुठलाही उजेड आजवर पाडलेला नाही. तरी देखील या सरकारला थोडा अधिक वेळ देण्याची दिलदार भाषा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. खरे तर, माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे सौजन्यच म्हणावयास हवे. परंतु या सौजन्याचा फारसा उपयोग होईल अशी चिन्हे नाहीत. नव्या सरकारला पुरेसा वेळ मिळूनही अजून मंत्रिमंडळ देखील निश्चित करता आलेले नाही. मंत्रिमंडळाचा सावळागोंधळ चालूच असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी ओकलेली गरळ शिवसेनेची फारच गोची करणारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी सावरकरांविषयी अनुदार उद्गार काढणार्या राहुल गांधी यांच्यावर आक्रमक ठाकरी शैलीत टीका केली होती. त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर आता मात्र आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी काँग्रेसची लाचारी करण्याची वेळ आली आहे. अशावेळी कुठे गेला तुमचा मराठी बाणा असा प्रश्न विचारावासा वाटतो. स्वातंत्र्यवीर सावरकर हे साधेसुधे नाव नव्हे. तेज, त्याग, तप आणि तत्त्व यांचे ते मूर्तिमंत प्रतीक आहेत. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना ज्यांनी आयुष्याचा होम केला अशा क्रांतिकारकांचे ते कुलपुरुष होत. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट देखील जारी केले होते. परंतु काँग्रेसच्याच टेकूने कश्याबश्या उभ्या राहिलेल्या ठाकरे सरकारला सत्तेपायी इतिहासाचे विस्मरण झाले आहे. विरोधीपक्ष नेते फडणवीस म्हणतात तो हाच अंतर्विरोध. एकंदरीत सोपा वाटणारा अधिवेशनाचा आठवडा अवघड ठरणार याची चिन्हे दिसू लागली आहेत.