Breaking News

दुंदरे येथील महिलेला जाळून फासावर लटकवले; नातेवाईकांचा आरोप

भाजप प्रदेश प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्याकडून सांत्वन; कारवाईची मागणी

पनवेल : बातमीदार
तालुक्यातील दुंदरे येथे एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह 4 फेब्रुवारी रोजी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या महिलेला जाळून ठार मारून फासावर लटकवले असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याची, तसेच औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावातील महिलेला पेटवून दिल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दुंदरे येथील घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी (दि. 6) मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.
दुंदरे येथील मृत महिलेचा मुलगा विश्वास माळी व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मयत शारदा माळी यांची गंठण एका महिलेने नेली होती. याबाबत त्यांनी विचारणा केली असता, 3 फेब्रुवारी रोजी अलका पाटील, वनाबाई दवणे, गोपाळ पाटील, हनुमान पाटील यांनी शारदा यांना शिवीगाळ केली व मंदिरात नेऊन शपथ घेण्यास लावले. या सर्व प्रकारामुळे शारदा यांना मानसिक त्रास झाला. त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी विश्वास माळी व त्याचे वडील गोविंद माळी हे कामासाठी बाहेर गेले होते. ते परत आले असता, दुपारी दीडच्या सुमारास शारदा यांचा मृतदेह दोरीच्या सहाय्याने घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शारदा माळी यांना विवस्त्र करून व रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न आला व नंतर गळफास दिला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
शारदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अलका पाटील, वनाबाई दवणे, गोपाळ पाटील, हनुमान पाटील व एक अल्पवयीन आरोपी अशा पाच जणांवर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरोपींना अटक करण्यात आली नसून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या प्रक्त्या चित्रा वाघ यांनी मृत पावलेल्या महिलेच्या नातेवाईकांची तालुका पोलीस ठाणे व दुंदरे येथे जाऊन भेट घेतली, तसेच त्यांचे सांत्वन केले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहआयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त अशोक दुधे, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणारे अत्याचार वाढू लागले आहेत. आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी या वेळी केली.

झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींवर पुढील कारवाई करावी. त्यामुळे मयत महिलेला न्याय मिळेल. सरकार कुठलेही असले तरी महिलांच्या सुरक्षेकडे संवेदनशीलतेने व गांभीर्याने बघितले पाहिजे. जिथे सरकार कमी पडेल, तिथे आम्ही बोलणारच. विकृत मानसिकता ठेचली पाहिजे.  
-चित्रा वाघ, भाजप प्रवक्त्या

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply