उत्पन्नवाढीसाठी महामुंबई क्षेत्रावर लक्ष
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
‘एनएमएमटी’ उपक्रमाला उभारी देण्यासाठी प्रशासनाने आता महामुंबई क्षेत्रावर लक्ष देण्याचे ठरविले आहे. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बससेवेचा दाखला देत त्या धर्तीवर शेजारील पनवेल महापालिका व उरण नगर परिषदेने योग्य ते सहकार्य केल्यास नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा तोटा भरून निघू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बससेवा महापालिकेच्या अनुदानावर सुरू असतानाच ‘बेस्ट’ने 9 जुलैपासून त्यांचे तिकीट दर कमी केले. या निर्णयाचा नवी मुंबई महापालिकेच्या ‘एनएमएमटी’ बस सेवेवर परिणाम झाला असून दिवसाला 20 ते 25 हजार प्रवासी कमी झाले आहेत. महिनाभरात सुमारे एक ते दीड कोटींचा आर्थिक फटका बसत आहे. यातून सावरायचे कसे, या प्रश्नामुळे ‘एनएमएमटी’ प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
त्यामुळे प्रशासनाने महामुंबई क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीतही ‘एनएमएमटी’ची बससेवा पनवेल, उलवे, उरणपासून करंजाडेपर्यंत सुरू आहे. या परिसरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना देण्यात येणार्या तिकीट सवलतीच्या बदल्यात ‘एनएमएमटी’ला महिन्याला सुमारे एक कोटी तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे ही सवलत बंद करण्यात आली आहे. पनवेल व उरण पालिकेने तो तोटा भरून द्यावा, अशी माफक अपेक्षा ‘एनएमएमटी’ प्रशासनाची आहे. उरण पालिका व पनवेल महानगरपालिका काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.