Breaking News

जागरुकतेची गरज

ज्वलनशील रसायनांची गळती झाल्यास तातडीने ती हुडकण्याची यंत्रणा या प्रकल्पात आहे का, तसेच तेथे ऑटोमॅटिक फायर स्प्रिंकलर देखील आहेत का, अशी विचारणा होते आहे. अर्थातच अशी यंत्रणा प्रकल्पात असावी, परंतु मंगळवारच्या दुर्घटनेनंतर ती कार्यान्वित का झाली नाही याची चौकशी होण्याची गरज आहे.

ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या उरण येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पात मंगळवारी पहाटे वाहिनीतील गळतीमुळे भीषण आग लागून या प्रकल्पाच्या उत्पादन विभागाच्या महाव्यवस्थापकांसमवेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तिघा जवानांचा बळी गेला. महाव्यवस्थापक सी. एन. राव यांनी स्वतःच्या जिवाची जोखीम पत्करून मुख्य झडप बंद करून गळती थांबवली, परंतु अन्य कुठे गळती होते आहे का याचा शोध ते जवानांसह घेत असतानाच स्फोट झाला आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला असे हाती आलेल्या प्राथमिक माहितीवरून दिसते आहे. ही दुर्घटना घडण्यामागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाली नसली, तरी एका प्रचंड मोठ्या दुर्घटनेपासून आसपासचा परिसर थोडक्यात बचावल्याचे मात्र स्पष्ट झाले आहे. ओएनजीसी प्रकल्प हा द्रोणागिरी पर्वताच्या एका भागात आहे. नागाव आणि म्हातवली ही दोन गावे या प्रकल्पाच्या नजीकच्या परिसरात असून नागावमधील काही घरे तर प्रकल्पापासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावर आहेत. प्रकल्प आणि या घरांच्या दरम्यान एक नाला वाहत असल्याने ज्वलनशील पदार्थासोबत आग अगदी आपल्या घरांपर्यंत आल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. आग लागल्याचे कळताच येथील नागरिक मोठ्या संख्येने भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी त्यांची पळापळ झाली. नागावची लोकसंख्या जवळपास 4500 इतकी आहे. यापैकी प्रकल्पाच्या खूपच जवळ राहणार्‍या 2500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सुदैवाने या गावांच्या समीप असलेल्या कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) टाक्यांपर्यंत ही आग न पोहोचल्याने मोठा स्फोट टळला. अन्यथा सुमारे 10-12 किलोमीटरच्या परिघातील परिसराला भीषण दुर्घटनेचा फटका बसला असता असेही सांगितले जात आहे. सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर, तसेच जेएनपीटीचे विश्वस्त आणि भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी दुर्घटनेविषयी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना धीर दिला, तसेच त्यांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली. प्रकल्पाचे उत्पादन महाव्यवस्थापक सी. एन. राव, तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांच्या कार्यतत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी घडलेल्या घटनेमुळे उरण येथील प्रकल्प अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कितपत सज्ज आहे याविषयी काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तेलप्रक्रियेवर या दुर्घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही, कारण संबंधित वायू तातडीने हाजिरा येथील प्रकल्पाकडे वळविण्यात आला. त्यामुळे प्रकल्पाने आपत्कालीन परिस्थिती सुयोग्य पद्धतीने हाताळली हेही दिसते आहे, परंतु प्रकल्पानजीकच्या गावांमधील लोक या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणात भयभीत झाले. या लोकांमध्ये प्रकल्प व संभाव्य धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याची मोठी गरज आहे. माहितीच्या अभावी वा निष्काळजीपणामुळे भीषण दुर्घटना घडू नये याची काळजी कसोशीने घेतली गेली पाहिजे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply