Breaking News

पनवेल, उरणमध्ये दुसर्यांदा पूरस्थिती

मुसळधार पावसाने पनवेलकरांना झोडपले

पनवेल : वार्ताहर

गेल्या 48 तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलमधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गणपती बाप्पासुद्धा पाण्यामध्येच बसविल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या 48 तासांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपून काढलेे आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल तालुका पोलीस ठाणे, मिरची गल्ली, साईनगर परिसर, बावन बंगला, मोहल्ला परिसर, सोसायटी परिसर यासह भिंगारी, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, रसायनी, तसेच पारगाव डुंगी, उलवा, बामणडोंगरी आदी भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. कित्येक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने शासकीय अधिकारी व महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने ज्यांच्या घरात गणपती बाप्पा बसविण्यात आले आहेत त्यांना आपल्या नातेवाईकांना कळवून गणेश दर्शनास न येण्यास सांगितले, तसेच काही गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असल्याने त्यांनीसुद्धा आपल्या नातेवाईकांना कळविले आहे.

पावसाचा फटका औद्योगिक वसाहतीला बसला आहे. महामार्गालगत असलेल्या काही कारखान्यांत पाणी शिरले आहे. पनवेल शहरातून जाणार्‍या उड्डाण पुलावरून देखील पाण्याची गळती सुरू झाली आहे. त्यातच वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये पाणी शिरल्याने काही तासांसाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. अनेक महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये पाणी शिरले आहे, तर कित्येक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. अजून तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून पोलीस व अग्निशमन दल सतर्क झाले आहेत. त्याचप्रमाणे गाढेश्वर नदी तुडूंब भरून वाहत आहे. रस्त्यावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. एकंदरीत या पावसामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे.

अग्नितांडवातून उरणकर जलतांडवात अडकले

उरण : रामप्रहर वृत्त

मंगळवारचा दिवस म्हणजे उरणकरांसाठी अग्निपरीक्षाच होती. चार जणांच्या मृत्यूनंतर त्यातून बाहेर पडताच मुसळधार पडणार्‍या पावसामुळे अनेक गावातील घरांत पाणी घुसले आहे. यातून गणरायाचीही सुटका झाली नाही. यामुळे उरणकर अग्नितांडवातून सुटून जलतांडवात अडकले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

मंगळवारचा दिवस हा उरणकरांसाठी महत्त्वाचाच म्हणावा लागेल. जनरल मॅनेजर राव, सीआयएसएफचे जवान नायका, कुशवाह व पासवान या चार जणांच्या बलिदानामुळेच आज लाखो उरणकरांचे प्राण वाचले आहेत. त्यांनी जर वेळीच यंत्रणा बंद केली नसती, तर आज उरणकरांची अवस्था भोपाळपेक्षाही महाभयंकर झाली असती. यातून सुटकेचा निःश्वास सोडत नाही तोच दोन दिवसांपासून पडणार्‍या पावसामुळे उरण तालुक्यातील जनतेला जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.

पडणार्‍या पावसामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने घरातील सामान वाचविण्यासाठी जिवाच्या आकांताने रात्रंदिवस जागून प्रयत्न सुरू आहेत. ऐन गणेशोत्सवातही पाणी घरात आल्याने गणरायालाही याचा त्रास सहन करावा लागत पाण्यातच वास्तव्य करावे लागत आहे. गावासह घरांत पाणी येण्याची ही तिसरी वेळ आहेे. गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे ऐन गणेशोत्सवात पुन्हा तिसर्‍या वेळी तालुक्यातील अनेक गावांतील घरांत पाणी शिरून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गणरायालाही याचा फटका बसत गणपतीच्या बैठकीपर्यंत पाणी लागले आहे. याबाबत वेळीच उपाययोजना केली नाही तर भविष्यात भयानक परिस्थितीचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply