कोकण हे महाराष्ट्राचे नंदनवन, कोकणी माणूस फणसाप्रमाणे राकट, तर हापूससारखा गोड, हा या मातीचाच गुणधर्म. अनेक साहित्यिक, विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी अशी अनेक नररत्ने या मातीने महाराष्ट्राला दिली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले स्वराज्य आणि स्वराज्याची राजधानी राष्ट्राला दिली. याच कोकणाने महाराष्ट्राला कोयनेची वीज दिली. आपले अस्तित्व संपवून जसे भगवंत शंकराने सृष्टीचे रक्षण केले, तसाच त्याग वेळोवेळी कोकणाने केला आहे. आज पुन्हा कोकणाच्या वाट्याला हे भाग्य येत आहे. खांदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाची पाणी गरज भागविण्याचे मौलिक कार्य कोकण करणार आहे, मात्र यासाठी कोकणाला आणि कोकणी माणसाला काही त्याग करावा लागणार आहे.
पश्चिमेला 720 किमी लांबीचा अरबी समुद्र, उत्तरेला सातपुडा पर्वत, पूर्वेला जवळपास 700 किमी लांबीचा उभा सह्याद्री आणि त्याची अभेद्य भिंत आणि दक्षिणेला गोमंतक प्रदेश अशा ह्या दर्याखोर्याच्या आणि नारळी, पोफळीच्या बागांच्या प्रदेशाला कोकण प्रदेश संबोधले जाते. जरी हा प्रदेश दुर्गम असला, तरी कधीच असाहाय्य आणि लाचार झाला नाही. सूर्याला झाकून टाकणारा मुसळधार पावसाळा तर रखरखत्या उन्हात होरपळणारा आणि जळणारा कोकण पाण्यासाठी वानवा असली, तरी इथल्या शेतकर्याने कधीच आत्महत्या केली नाही. मुंबई घडविली पण कधीच मुंबईवर अधिकार गाजविला नाही. सदासदैव ताठ मानेने आणि स्वाभिमानाने जगणारा इथला कोकणी माणूस कधीच कोणासमोर लाचार झाला नाही. स्वतःच्या वाट्याचा कोकण विकासाचा निधी प्रत्येक वेळी विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वळविला, तरी कधीच कोकणाने नाराजी व्यक्त केली नाही की स्वतंत्र कोकणाची मागणी केली नाही. सदैव महाराष्ट्रासोबत राहून एका छोट्या आणि दुर्लक्षित भावाप्रमाणे खांद्याला खांदा देत प्रत्येक संकटात महाराष्ट्राची साथ दिली.
कोकणात प्रतिवर्षी जवळपास 3000 मिमी एवढा प्रचंड पाऊस पडतो. पूर्वेकडील राज्यांपेक्षा भारतातील हे पावसाचे सर्वाधिक प्रमाण आहे. कोकणच्या 30 हजार 747 वर्ग किमी क्षेत्रफळाच्या भूप्रदेशावर हा सर्वाधिक पाऊस बरसत असून करोडो-अब्जो क्युसेक एवढे पाणी फुकटचे समुद्रात जात आहे. कोकणात पावसाळी भातशेती हे एकमेव पीक होत असल्या कारणाने, केवळ चार हजार वर्ग किमी क्षेत्रफळ सिंचनाखाली आहे. याचा अर्थ केवळ 10 टक्के भूभाग सिंचनाखाली आहे. कोकणात मोजकीच आणि लहान माती धरणे असून, ती पावसाचे पाणी अडविण्यात सक्षम नाहीत. महाराष्ट्राच्या याच कोकण भूमीपासून काही किमी अंतरावर असणार्या, मात्र समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंचावर असलेल्या सह्याद्रीच्या पलीकडचा माण प्रदेश असो वा दख्खन पठार काही मिलीमीटर पडणार्या पावसावर जगत आहे, मात्र पाण्याचे प्रचंड नियोजन आणि मोठमोठी धरणे असूनही पाऊस पडला नाही तर हा प्रदेश दुष्काळाने होरपळून जातो. महाराष्ट्रात हा प्रदेश जेथे अल्प आणि अतिअल्प पाऊस पडूनही पाण्याच्या एका एका थेंबाचे नियोजन करून सुजलाम सुफलाम आणि उपजावू प्रदेश झाला आहे, तर त्याच वेळी कोकणात मुसळधार पाऊस कोसळूनही हा प्रदेश उपजाऊ नाही, तर पाण्याचे नियोजन होत नसल्याने उन्हाळ्यात याच कोकणावर पाणीटंचाईचे भयानक संकट ओढवत असते. ही विदारक मात्र सत्य परिस्थिती आहे.
कोयनेच्या वीजनिर्मितीनंतर दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या टप्प्यातून वाशिष्टी नदीने समुद्राला वाहून जाणारे पाणी मुंबईच्या दिशेने वळवावे, असा प्रस्ताव वेळोवेळी पुढे आला होता, मात्र आजवरच्या नाकरत्या सरकारला हे कधी उमगलेच नाही. ते सत्य उमगले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. महाराष्ट्रातील पाण्याच्या एका एका थेंबाचे नियोजन करण्यासाठी जलयुक्त शिवार आणि भूगर्भ पूनर्भरण उपक्रम राबविला आणि तो यशस्वी करून दाखविला. मुख्यमंत्र्यांना यासाठी अनेक सामाजिक संस्थानांचे योगदान आणि साथ लाभली. देवेंद्रजींना सतत याची जाणीव होती, कोकणातले वाहून जाणारे हे पाणी देशाकडे वळवायचे आणि नद्या जोडून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनवायचा हे त्यांचे स्वप्न. त्यांच्या या अभिनव प्रकल्पाला आता सत्यात उतरविण्याची वेळ आली आहे. सह्याद्रीच्या उतारावर ठिकठिकाणी मोठी धरणे बांधून हे पाणी लिफ्ट करून अर्थात भव्य इलेक्ट्रिक पंपांच्या सहाय्याने उचलून खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला नेण्याचा हा प्रकल्प आहे. महाडमधील शिवथर परिसरात या प्रकल्पातील पहिला प्रकल्प लवकरच कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पातून कोकणातील पाणीटंचाई कायमची दूर होणार आहे, तसेच वीजनिर्मिती होणार आहे. ही वीज उद्योगधंद्यांना वापरून शेतीसाठी वापरली जाणार आहे. जलविद्युत प्रकल्पातून निर्माण होणार्या विजेचा खर्च कमी असल्याकारणाने ही वीज स्वस्त दरात ग्राहकांना देता येणार आहे, तसेच लिफ्ट इरिगेशन करण्यासाठी या विजेचा उपयोग होणार आहे. यासाठी कोकणातील शेतकर्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. हीच मेख ओळखून विरोधकांनी शेतकर्यांची माथी भडकावण्याचे उद्योग सुरू केले आहेत, मात्र कोकणातील शेतकर्यांनी या विरोधकांच्या चिथावणीला बळी पडू नये. संपादित केलेल्या शेतकर्यांना चांगला मोबदला मिळणार आहे, तसेच या प्रकल्पांमुळे कोकणाच्या नंदनवनात आणखी भर पडणार आहे. कोकणाचा खर्या अर्थाने विकास होणार्या या प्रकल्पांना कोकणी माणसाने कोकणी संस्कृती आणि स्वभावाप्रमाणे पाठिंबा दिला पाहिजे. यातच कोकणाचे आणि महाराष्ट्राचे भले आहे.
-महेश शिंदे