Breaking News

कोरोनामुक्तीच्या दरात वाढ; पनवेल, नवी मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई शहरात 50,452 कोरोनाबाधितांपैकी 48432 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जून महिन्यात 57 टक्क्यांवर असलेला कोरोनामुक्तीचा दर नोव्हेंबर महिन्यात 94 टक्क्यांवर पोहचला होता. यात दोन टक्क्यांनी वाढ होत आता 96 टक्के झाला आहे. तसेच पनवेल पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्के एवढे असून यामध्ये कामोठे व खारघर येथे 97 टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत असल्याने नवी मुंबई शहर कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असल्याचे बोलले जात आहे. दररोजच्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या आता शंभरच्या आत आली आहे. चाचण्यांची संख्याही कमी करण्यात आली नाही. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतरही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यानंतर शहरात जास्तीत जास्त चाचण्या करीत तत्काळ उपचार करण्याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले होते. यासह इतर अनेक उपाययोजनांमुळे कोरोनामुक्त होण्याचा दर वाढला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेले 50 वर्ष वयोगटांवरील रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान, पनवेल शहर पालिका क्षेत्रात गुरुवारी कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत पालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 27,240 वर पोहचली आहे. 595 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 26,303 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply