Breaking News

रायगड जिल्ह्यात पाऊस धुवांधार

सुधागड जलमय; अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

पाली ़: प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 4) अंबा नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली आंबा नदी पुलांवरून पुन्हा एकदा पाणी गेले, तसेच जांभूळपाडा आंबा नदी पुलालादेखील पाण्याने वेढा दिला.त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बुधवारी बंद ठेवण्यात आली होती. खोलगट व सखोल भागात पाणी शिरले आहे. तालुक्यातील विहिरी, नद्या, नाले, तलाव व ओढे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत.

आभाळ फाटल्याप्रमाणे कोसळणार्‍या पावसाने  गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. एरव्ही सणासुदीच्या दिवशी गजबजणार्‍या बाजारपेठेत ऐन गणेशोत्सवाच्या काळात शुकशुकाट होता. जांभुळपाडा गावात काही ठिकाणी पाणी घुसले होते, तसेच पालीजवळ भाग्यश्री प्लाझाजवळ पाणी आले होते. पाली आणि बलाप येथील काही घरांना पाण्याने वेढा दिला होता. परिसरातील शेती पाण्याखाली गेल्याने पिकांची नासाडी होऊन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वत्र पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रहदारीचे मुख्य रस्ते बंद झाल्याने नोकरदारांना सक्तीची रजा घ्यावी लागली. दरम्यान, पाली बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने एसटी बसेसचा मार्ग रोखला गेला. त्यामुळे नागरिक, प्रवाशांचे  अतोनात हाल झाले. तहसीलदार दिलीप रायन्नावार, पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, नागोठणे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आपत्ती व्यवस्थापणाच्या दृष्टीने सज्ज होते. वाकण नाक्यावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता.पाली-खोपोली मार्गाकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली होती. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुधवारी पहाटेपासूनच पालीसह अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वाकण फाट्यावर, पाली व जांभुळपाडा अंबा नदी पूल येथे पोलीस तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर नांदगाव व शिळोशी येथील पुलावरूनदेखील पाणी गेले.

अतिवृष्टीमुळे नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. पाली व जांभूळपाडा पुलांजवळ पोलीस व महसूल कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येकाने देखील आपली काळजी घ्यावी. आवश्यकता नसल्यास जोखीम घेऊन घराबाहेर पडू नये.

-दिलीप रायन्नावार,तहसीलदार, सुधागड-पाली

रोह्यात कुंडलिका नदीला पूर

रोहे : प्रतिनिधी

गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने रोह्यात धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी रात्री पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात पाणीच पाणी साचले आहे. कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केले आहे. कुंडलिका नदीवरील जुना रोहा अष्टमी पूल पाण्याखाली गेला असून नव्या पुलालाही पाणी लागल्याने रोहा-नागोठणे, रोहा-अलिबाग या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रोहा-कोलाड मार्गावर संभे व भुवनेश्वर येथे पाणी आल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद आहे.

शहरातील डबरी कॉम्प्लेक्ससमोर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. दमखाडी गावासह अष्टमी नाका, कोळीवाडा, बौद्धवाडी, खालचा मोहल्ला या ठिकाणी पाणी शिरले. शहरानजीक वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वरमधील आदर्शनगर, वैभवनगर परिसरातही पाणी घुसले आहे. या ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. त्यामुळेे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंडलिका नदीच्या किनार्‍यावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंड येथे दरड कोसळल्याने बुधवारी सकाळपासूनच हा मार्ग बंद होता. कोकण रेल्वे मार्गावर  आलेला दगड तातडीने हलविण्यात आला असला, तरी या रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. रोहा-भालगाव मार्गे मुरूड मार्गावर उचल या या ठिकाणी मोठे झाड रस्त्यावर कोसळले आहे, त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.रोहा शहरातून बाहेर जाण्याचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply