Breaking News

धार्मिक भावना भडकाविणार्‍या पोस्ट, व्हिडीओ व्हायरल करू नका; नवी मुंबई पोलिसांचे आवाहन

पनवेल : वार्ताहर

त्रिपुरा येथे मशिदीवर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशासह राज्यात उमटू लागले आहेत. नागरिकांनी धार्मिक भावना भडकवणारे आणि खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित न करण्याच्या सूचना नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह व्हिडिओ अथवा पोस्ट करताना कुणी आढळून आल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यात यावी, असे आवाहनदेखील पोलिसांकडून करण्यात आले आहे. सामाजिक शांतता भंग करणारे समाजविघातक व्हिडिओ, पोस्ट अथवा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पोस्ट, व्हिडिओवर लक्ष ठेवण्याबाबत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल माध्यमांना पोलिसांकडून कळविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करताना सामाजिक भान ठेवत माहिती-तंत्रज्ञान अधिनियम 2000, (आयटी अ‍ॅक्ट 2000)मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. त्याचप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे, ग्रुपमध्ये असणारे सर्व सदस्य विशेषतः ग्रुप अ‍ॅडमिनने आपल्या ग्रुपमध्ये अशा प्रकारचे पोस्ट किंवा व्हिडिओ प्रसारित होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. धार्मिक भावना भडकविणारे आणि खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित करू नये, तसेच अशा प्रकारची आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करताना कुणीही आढळून आल्यास त्याची माहिती त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात देण्यात यावी, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply