मोबाइलच्या अतिवापराची परिणती वाढत्या रागात होते आहे. अनेक मानसोपचार तज्ज्ञ पुन्हा पुन्हा मोबाइलच्या अशातर्हेने व्यक्तीच्या मानसिकतेवर होणार्या परिणामांकडे वारंवार लक्ष वेधत आहेत. रागाच्या भरात होणार्या या गंभीर गुन्ह्यांचा मानसोपचार तज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास होण्याची गरज निश्चितच दिसते आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात सोमवारी एका 13 वर्षांच्या मुलाने आपल्या 30 वर्षीय शिक्षिकेची चाकूने अनेक वार करून हत्या केली. संबंधित शिक्षिकेची सहकारी असलेल्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलाने गृहपाठ न केल्याने शिक्षिकने त्याला झापले. त्यानंतर तो घरी गेला आणि घरून स्वैपाकघरातील चाकू आणून त्याने पाठीमागून शिक्षिकेवर वार केले व नंतर तो चाकू तिच्या शरीरात रूतून बसेपर्यंत तो तिला भोसकत राहिला. शेजारीपाजारी जमा झाल्यावर त्याने लागलीच आपल्या कृत्याची कबुली दिली. परंतु नंतर मात्र तो प्रत्येकाला वेगवेगळी कारणे सांगू लागला. आपल्या आईला पैसे उधार देण्यास नकार दिल्याने आपण शिक्षिकेला मारले, तिने आपल्याला काठीने मारले म्हणून आपण तिला मारले, कुणा इसमाने आपल्याला तिला मारल्यास 2 हजार रूपये देईन व न मारल्यास नाल्यात टाकून देईन असे सांगितले अशी अनेक कारणे त्यांनी सांगितली आहेत. परंतु विषय या एका घटनेपुरता मर्यादित आहे कुठे? अलीकडे अक्षरश: दिवसाआड कुठे न कुठे अशा स्वरुपाची घटना घडते आहे. अशातर्हेने रागाच्या भरात हल्ला करणारा किशोरवयीन मुलगा वा प्रौढ व्यक्ती ही सराईत गुन्हेगार नसते. परंतु रागाच्या भरात नजीकच्याच व्यक्तीचा खून करण्यापर्यंत त्या व्यक्तीचा कडेलोट होतो. अशा घटनांमध्ये विशी, तिशी, चाळिशीतील व्यक्तींना आपल्या रागाचे योग्य नियमन करण्यात अपयश आल्याचे दिसून येते. कधी भावाने पबजी खेळायला दिले नाही म्हणून किशोरवयीन मुलगा मोठ्या भावाचा खून करतो, कधी वडील रिकामटेकडेपणाबद्दल सतत टोकतात म्हणून तिशीच्या उंबरठ्यावरचा बेरोजगार तरुण वडिलांंच्या शरीराचे तुकडे-तुकडे करतो. तर एखाद्या विरळा घटनेत आई वा वडिलांचाही अशाच प्रकारे रागाने तोल गेल्याचे आढळून येते. लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या वडिलांच्या सततच्या खोकण्यामुळे विशीतील पोराने वडिलांना शिवीगाळ केली आणि त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी थेट उठून आपल्या जुन्या सर्व्हिस रायफलने त्याच्यावर दोन गोळ्याच झाडल्या असेही कुठे घडते. रस्त्यांवरील वाहनचालकांच्या वादातून खूनापर्यंत मजल जाण्याच्या तर कित्येक घटना पहायला मिळतात. अशातर्हेच्या बातम्या अलीकडे प्रसारमाध्यमांमध्ये सतत दिसत राहतात. कशामुळे होतो रागाचा इतका कडेलोट? रागाचे व्यवस्थापन कठीण का होत चालले आहे? काही वर्षांपूर्वी अशा घटना कमी का होत्या? अमेरिकेत माथेफिरूने शाळेत शिरून वा मॉलमध्ये बेबंद गोळीबार केल्याचे आपण वाचतो तेव्हा तेथील समाजव्यवस्थेत मानसिकदृष्ट्या विचलित लोकांकरिता संवादाची व्यवस्था नसल्याची चर्चा आपल्याकडे होते. परंतु व्यक्तिगत पातळीवरील नैराश्य, ताण, क्रोध यांचे नियमन करण्याची व्यवस्था युरोप-अमेरिकेत समुपदेशनाच्या विविध व्यावसायिक व्यवस्थांमधून उत्तम करण्यात आल्याचे दिसते. उलट आपल्याकडे मात्र अद्यापही अशा समस्यांकरिता तज्ज्ञांकडून समुपदेशनाची मदत घेण्याची वृत्ती फारशी दिसत नाही. एकीकडे एकत्र कुटुंब पद्धतीचा आधार तर केव्हाचाच इतिहासजमा झाला आहे. आता तर छोट्या कुटुंबांमध्ये आईवडिलांचे एकुलते एक अपत्य असलेल्या मुलांना मित्रमंडळींखेरीज मन मोकळे करण्यासाठी अन्य जागाच नसते.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …