नागोठणे : प्रतिनिधी
विभागातील पळस येथील शिवरामभाऊ शिंदे मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेला 20 वा साखरचौथ गणेशोत्सव धार्मिक वातावरणात साजरा झाला. मंगळवारी सकाळी पोलीस पाटील बबन शिंदे दाम्पत्याच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंगळवारी दुपारी धनिष्ठा ठमके (पोफळघर) यांचे जय बजरंग महिला नाच मंडळ आणि अस्मिता धाडवे (वणी) यांचे मरीआई महिला नाच मंडळ यांच्यातील शक्तीतुरा सामना रंगला. सायंकाळी हरिपाठ व रात्री स्थानिक महिला मंडळाच्या पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम झाला. बुधवारी दुपारी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊन सायंकाळी निडीच्या अंबा नदीत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मंडळाच्या माध्यमातून 20 वर्षे साखरचौथ गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे, त्यात सर्व ग्रामस्थ सहभागी होतात. गणेशोत्सवाबरोबर वर्षभरात स्थानिक पातळीवर क्रीडा स्पर्धा, हरिनाम सप्ताह, क्रिकेटचे सामने, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे उपक्रम राबविण्यात येतात, असे मित्रमंडळाचे पदाधिकारी हिराजी शिंदे यांनी सांगितले. हा साखरचौथ गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे चंद्रकांत भालेकर, योगेश विचारे, हिराजी शिंदें, राकेश शिंदे, नरेश भालेकर, गणेशोत्सव समितीचे राकेश शेलार, नितीन शिर्के, नामदेव शिंदे, हर्षल भालेकर, संजोग शेलार, समाधान विचारे, कुणाल भालेकर आदी पदाधिकार्यांसह सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.