केंद्र सरकारच्या संबंधित निर्णयानुसार आता देशात ई-सिगारेटचे उत्पादन करण्यावर तसेच विक्री, साठवणूक, जाहिरात आणि आयात-निर्यातीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पहिल्यांदा नियमभंग केल्यास एक लाख रुपये दंड व एक वर्षाचा तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याउप्परही पुन्हा हा नियमभंग केल्यास पाच लाख रुपये दंड व तीन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल.
देशातील तरुणाईच्या भल्या-बुर्याचा बारकाईने विचार करणार्या केंद्र सरकारने बुधवारी देशभरात ई-सिगारेटवर बंदी लागू केली. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच मार्च महिन्यात ही बंदी लागू केली असून महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यांत ई-सिगारेटवरील बंदी याआधीपासूनच लागू आहे. अगदी 18 वर्षांखालील महाविद्यालयीन तरुणांनाही या ई-सिगारेटने झपाट्याने व्यसनाच्या विळख्यात ओढणे सुरू केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तूर्तास ई-सिगारेट सदृश उत्पादनांचे एकूण निकोटिन उत्पादनांतील प्रमाण अवघे एक टक्का इतके असले तरी ते झपाट्याने वाढते आहे. अमेरिकेसारख्या देशाने केलेली चूक आपण करायला नको. तिथे ई-सिगारेट बाजारात उपलब्ध झाल्यापासून त्यांच्या सेवनाचे अर्थात वॅपिंगचे प्रमाण अफाट वेगाने वाढले. आता तिथे त्यातून संभवणार्या गंभीर स्वरुपाच्या आरोग्यहानीची माहिती उघडकीस येत असून काही प्रमाणात मृत्यूसही ही उपकरणे कारणीभूत ठरत आहेत असे टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर सर्जन डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने घातलेल्या छाप्यांमध्ये सुमारे एक लाख रुपयांइतक्या किंमतीचा ई-सिगारेटचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. अर्थात राज्यातील बंदीमुळे गल्लीबोळात ई-सिगारेट सहज उपलब्ध होणे बंद झाले असले तरी तिची ऑनलाइन खरेदी-विक्री मात्र सर्रास सुरू होती. ऑनलाइन शॉपिंग साइटवर या ई-सिगारेटी 300 रुपयांपासून तीन हजार रूपयांपर्यंत विविध किंमतीला उपलब्ध आहेत. नुकतीच ज्युनियर कॉलेजांमध्ये दाखल झालेली 18 वर्षांखालच्या वयांतील अनेक मुलेदेखील त्यांचा सर्रास वापर करतात हे सर्वज्ञात आहे. अन्न आणि औषध प्रशासन आता ऑनलाइन विक्रेत्यांकडे आणि त्यांच्याकडील साठ्यांकडे मोर्चा वळवणार असल्याचे संबंधित अधिकार्यांनी म्हटले आहे. तसे झाले तरच ही बंदी प्रभावीरित्या प्रत्यक्षात येऊ शकेल. अर्थात ई-सिगारेटवर बंदी आली की या सिगारेटच्या व्यसनाच्या आहारी गेलेले सर्वसाधारण सिगारेटकडे वळतात हे देखील यापूर्वी दिसून आले आहे. त्यामुळेच सिगारेटचे व्यसन सोडण्यास पूरक ठरणार्या गोष्टी उदाहरणार्थ गम, पॅचेस आदी गोष्टी जगभरात पर्याय म्हणून मुबलक प्रमाणात व सहजरित्या उपलब्ध केल्या जातात. यापूर्वी निकोटिन हा तंबाखूच्या तुलनेत सुरक्षित पर्याय गणला गेला होता. निकोटिनच्या सेवनाकरिता उपलब्ध असणार्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्वसाधारण सिगारेट, सिगार, हुक्का आदी आकारांत किंवा पेन, युएसबी स्टिक आदी आकारांत उपलब्ध असलेल्या आढळतात. मात्र अतिशय शुद्ध अवस्थेतील निकोटिनमुळे कर्करोग होऊ शकतो. ई-सिगारेटच नव्हे तर सर्वसाधारण सिगारेटच्याही विरोधात मोठी आघाडी उघडण्याची गरज असून त्यातून संभवणारा कर्करोगाचा अत्यंत क्लेशकारक धोका व्यसनाधीनांच्या नजरेस आणून दिला गेला पाहिजे.