Breaking News

आसू आणि हसू!

शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

नाशिक : प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरगती प्राप्त झालेले स्क्वॉर्डन लीडर निनाद मांडवगणे (वय 33) यांच्यावर शुक्रवारी (दि. 1) नाशिकमधील गोदावरीच्या तिरावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिककरांनी तुफान गर्दी केली होती. भारतमाता की जय…, शहीद निनाद मांडवगणे अमर रहे, अशा घोषणांनी या वेळी गोदाकाठी एकच ‘निनाद’ घुमला.   

जम्मू-काश्मीरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत टेहळणी करीत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय 33) यांना वीरमरण आले. निनाद हे मूळ नाशिकचे. त्यांचे माता-पिता बॅँकेतून सेवानिवृत्त असून, ते पुणे महामार्गावरील रवीशंकर मार्गालगत बँक ऑफ इंडिया कॉलनीत वास्तव्यास आहे. निनाद यांचे पार्थिव वायुसेनेच्या विमानातून गुरुवारी रात्री 10च्या सुमारास ओझर विमानतळावर आणण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळीच नाशिकमधील डीजीपीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव ओझर येथून वायुसेनेच्या सजवलेल्या वाहनातून दाखल झाले. या वेळी अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला होता. पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनीही अमरधाम येथे निनाद यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. लष्करी धून, तसेच हवेत फैरी झाडून निनाद यांना मानवंदना देण्यात आली.

वर्धमान अभिनंदन मायदेशी परतले; जोरदार स्वागत

वाघा बॉर्डर : वृत्तसंस्था

भारताच्या लष्करी तळांवर हल्ल्यासाठी आलेल्या पाकिस्तानी एफ-16 विमानाच्या अवकाशातच चिंधड्या उडवणारे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी (दि. 1) अखेर मायभूमीत परतले. पाकिस्तानने रात्री 9.02च्या सुमारास कडक सुरक्षेत अभिनंदन यांनी भारतीय भूमीत पुन्हा पाऊल ठेवले, मात्र यासाठी पाकने भारतीयांना मोठी प्रतीक्षा करायला लावली.

भारतीय हवाई दलाच्या उच्च अधिकार्‍यांच्या पथकाने अभिनंदन यांचे मायभूमीत स्वागत केले. अभिनंदन यांचे आई-वडीलही या वेळी उपस्थित होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा सीमेवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. अभिनंदन यांनी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करताच तेथे उपस्थित भारतीयांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. हा क्षण टीव्हीवरून पाहणार्‍या देशवासीयांनीही एकच जल्लोष केला.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पायलट अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्याची घोषणा गुरुवारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या सैन्याने अभिनंदन यांना भारताच्या हवाली केले. अभिनंदन मायभूमीत दाखल होताच एअर व्हाईस मार्शल प्रभाकरन आणि एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर यांनी त्यांचे स्वागत केले. आता अभिनंदन यांना दिल्लीला नेण्यात येईल व तिथे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply