Breaking News

महायुती लाखोंच्या फरकाने विजयी

काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा; विधानसभेची वाट बिकट

मुंबई ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रात फक्त सर्वाधिक जागाच जिंकलेल्या नाहीत तर अनेक जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत मोठे मताधिक्यही मिळवले आहे. 2014 प्रमाणे 2019 मध्येही भाजपा-शिवसेना युतीने 48 पैकी 41 जागा जिंकल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून समोर आलेल्या तपशीलानुसार भाजपा-शिवसेना युतीने लोकसभेच्या 16 जागांवर तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला आहे.

यामध्ये नऊ शहरी लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील पाच तर पुणे, मावळ, नाशिक आणि नागपूर या चार लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मुंबई उत्तर, उत्तर-पूर्व मुंबई, मुंबई उत्तर-पश्चिम ठाणे आणि कल्याण हे मुंबई महानगर प्रदेशातील ते पाच लोकसभा मतदारसंघ आहेत. जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना युतीच्या उमेदवारांच्या जवळपासही पोहोचता आले नाही.

अकोला, धुळे, जालना, लातूर, रावेर, जळगाव आणि अहमदनगर या ग्रामीण भागातील सात मतदारसंघात युतीचे उमेदवार दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. 16 पैकी भाजपाने 12 आणि शिवसेनेने चार लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. युतीच्या उमेदवारांना मिळालेले हे मताधिक्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवणारे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला फक्त पाच जागांवर विजय मिळवता आला. सर्व निकाल एक्झिट पोलच्या अंदाजानुसारच आले. काँग्रेस एक तर राष्ट्रवादीला चार जागांवर विजय मिळाला.

राणे फॅक्टर चालेना..

चंद्रपूरमध्ये अवधी एक जागा जिंकण्यात काँगे्रसला यश आलं.तर कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात राणे फॅक्टर चालेल असं वाटलं होतं. मराठा आरक्षणामुळे राणे सुपुत्राला त्याचा फायदा उठवता येईल, असे राजकीय विश्लेषक गणितं मांडीत होते. मात्र, ऐनवेळी प्रचारात राणे दहशतवादी विरोधी उठवलेली आरोळी, आक्रमक पिता-पुत्र यांची भूमिका पुन्हा एकदा जनतेसमोर यशस्वीरित्या मांडण्यात आली आणि याचा फटका अखेर निवडणूक निकालात बसला. त्यात नीलेश राणेंचे विश्वासू समर्थक फुटल्याने पराजय निश्चित झाला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply