Breaking News

राहुल गांधी यांचे नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे ‘असुरी प्रेम! ‘नफरतसे नही, प्यार से जितेंगे’ची नवी परिभाषा!

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतू, इंदिरा गांधी यांचे नातू, राजीव आणि सोनिया गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी बिनविरोध निवडून येत सुत्रे हाती घेतली. तत्पूर्वी सोनिया गांधी या तब्बल 19 वर्षे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा होत्या. प्रकृतीच्या कारणामुळे सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना आधी पक्षाचे उपाध्यक्ष बनविले आणि नंतर अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. दुर्दैवाने राहुल गांधी हे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचा काँग्रेस पक्ष हा देशात सत्तेऐवजी विरोधी पक्षात आणि नरेंद्र मोदींसारखे जबरदस्त धुरंधर व्यक्तिमत्त्व असलेले भारताच्या पंतप्रधानपदी असे चित्र देशाच्या राजकारणात पाहायला मिळाले.

28 डिसेंबर 1885 रोजी सर अ‍ॅलन ह्यूम या विदेशी व्यक्तीने काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि विदेशी मूळ असलेल्या सोनिया गांधी यांच्या हाती हा पक्ष 19 वर्षे होता. राहुल गांधी यांचाही जन्म इटलीमध्येच म्हणजे सोनियांच्या माहेरी म्हणजे राहुलच्या मामाच्या गावाला झाला. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिले बिगर काँग्रेसी सरकार भारतात आले आणि काँग्रेस पक्षाची या जबरदस्त अशा मोदी सरकार व भारतीय जनता पार्टीने धूळधाण उडवली. 1947च्या 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षात सुमारे 55 वर्षे काँग्रेस पक्षानेच सत्ता भोगली, उपभोगली. त्यातही जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या एका कुटुंबाच्या हाती पंतप्रधानपद आणि त्यानंतर 10 वर्षे डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदी असले, तरी त्याचा रिमोट कंट्रोल हा सोनिया गांधी यांच्याच हाती होता. त्यामुळे आपल्या घराण्याच्या हातून, काँगे्रसच्या हातून मोदी नावाच्या गुजराती सिंहाने सत्ता हाती खेचून घेतल्यामुळे सोनिया-राहुल आकांडतांडव ना करतील तरच आश्चर्य.

सोनिया गांधी यांना निदान भाषणे लिहून देण्यात येत असल्याने त्या सुसंस्कृत बोलण्याचा प्रयत्न तरी करीत असत, पण अचानक पाण्यात पडल्यानंतर माणूस कसा हातपाय मारून पोहोण्याचा प्रयत्न करतो तशी गत राहुल गांधी यांची झाली. अचानक डिसेंबर 2017 मध्ये 100 वर्षे जुन्या(?) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर लोकशाहीच्या रथाचं चाक समजण्यात येणार्‍या विरोधी पक्षाचे नेतृत्व कसे असायला हवे? ज्या दिवशी राहुल गांधी यांनी काँगे्रस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारतातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचे चांगले प्रबोधन होईल अशी अपेक्षा होती, पण आडातच नाही तर पोहोर्‍यात कुठून येणार? स्तुतीपाठक ‘व्वा, व्वा, क्या बात है!’ सुपर्ब, जबरदस्त, ऐसा भाषण पहले किसीने कियाही नही, अशा पद्धतीने राहुल गांधींच्या पहिल्याच भाषणाचं कौतुक करताना आढळत होते. विचारांची लढाई विचारांनी होईल, कामांचे उत्तर कामांतून दिले जाईल अशी अपेक्षा असते, पण कसलं काय अन् कसलं काय? मला सतीश चतुर्वेदी यांनी सुमारे 15 वर्षांपूर्वी केलेले वक्तव्य आठवते. ‘अरे, भाई! यह तो चकल्लस है। तुम्हे क्या लगा हमें सोनियाजीसे प्यार है इसलिये हमने उन्हे पार्टी का अध्यक्ष बनाया है? बिल्कुल झूठ, अरे, हम आपसमें लडके मरेंगे, हमारे कोई अध्यक्ष बनें तो इसलिए डुबते को तिनके का सहारा इसलिए सोनियाजीको अध्यक्ष बनाया, वैसे हमारे पार्टी में काबिल लोगों को कोई कमी नही। लेकीन गांधी नेहरू परिवार का ही हमें नेतृत्व चाहिये।’ आज सतीश चतुर्वेदी हे काँग्रेस पक्षात नाहीत, पण त्यांनी सांगितलेले वास्तव आहे. भिष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कौरवांबरोबर होते कारण धृतराष्ट्राच्या हस्तीनापूरबरोबर त्यांची बांधिलकी होती म्हणून ही मंडळी त्यांच्याबरोबर राहिली. त्यांना माहीत होतं की पांडवांची बाजू धर्माची, सत्याची आहे, पण धृतराष्ट्र हा हस्तीनापूरचा राजा आणि दुर्योधन, दुःशासन ही त्यांची मुले त्यामुळे त्यांची पापं पोटात घालून भिष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य यांना नाईलाजाने त्यांच्याबरोबर राहावे लागले. त्याचप्रमाणे मोतीलाल वोरांपासून अनंतराव गाडगीळ यांच्यापर्यंत निष्ठावंतांना नाईलाजाने सोनिया-राहुल बरोबर राहावं लागत आहे. काकासाहेब गाडगीळ, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ आणि आता प्रा. अनंत गाडगीळ अशा तीन पिढ्या नेहरू गांधी परिवाराशी घनिष्ठ संबंध ठेवून आहेत. अर्थात मोतीलाल वोरा, अनंत गाडगीळसारख्या निष्ठावंतांनी राहुल गांधी यांना नीट मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे, पण मोतीलाल वोरा वयोवृद्ध झाले असून त्यांच्या हाती काही नाही तर प्रा. अनंत गाडगीळ हे राहुल-सोनियांच्या निकटवर्तीय असतानाही त्यांची पक्षात कोणतीही किंमत नाही. ‘पृथ्वी’ मिसाईल तसं चांगले आहे, पण त्यांचीही कृपाचार्यांसारखी अवस्था झाली. सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था पृथ्वीराज बाबांची झाली आहे. उल्हास पवारांचे गॉडफादर विलासराव गेल्यापासून ते बिचारे अडगळीत पडले आहेत. आता नवे बुद्धिवंत, विचारवंत पक्षात आहेत, पण राहुलबाबा त्यांचे ऐकेल तरच खरं.

राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधानांना मिठी काय मारली, डोळा काय मारला. त्यांच्या या हरकती एकदम बालीश ठरल्या. त्याला नरेंद्र मोदी यांनी उत्तरही चपखलपणे दिले. अर्थात नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलनाच होऊ शकत नाही. संघाच्या मुशीतून तयार झालेल्या, राजकारणाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेल्या मुख्यमंत्री पदापासून पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधींचा टिकाव लागणे निव्वळ असंभव, पण ‘ब्रेकिंग न्यूज’वाले ‘नमो-रागा’ची राग आलापतात त्याला कोण काय करणार? कीव येते बिच्चार्‍यांची. राहुल गांधी यांचे सल्लागार कोण आहेत? हे सल्लागार काय सल्ला देतात? मुळात राहुल गांधी यांनी विचार प्रवर्तक भाषणे, मार्गदर्शन एक पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देण्याची गरज आहे. दोन राज्यांत काँग्रेस पक्षाला यश मिळाल्यामुळे ते हुरळून गेलेत. पुलवामावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण सूट दिली. बालाकोट येथे जैशच्या अतिरेकी अड्ड्याला हवाई दलाच्या 12 विमानांनी हल्ला करून ते उद्ध्वस्त करताना मसूद अझरचे दोन भाऊ, एक मेव्हणा यांना यमसदनाला धाडले. मिराज 21 च्या बहादूर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून सहीसलामत भारतात आला. हा माहोल देशभक्ती, राष्ट्रप्रेम ओतप्रोत भरलेले दिसत असताना 56 इंचाची छाती दाखवून देणार्‍या नरेंद्र मोदी यांनी कसलीही पर्वा न करता अजित डोवाल, निर्मला सीतारामन, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, अरुण जेटली, डॉ. सुभाष भामरे यांच्यासह तीनही सैन्यदलाचे प्रमुख यांच्यासमवेत तासन्तास चर्चा करून परिस्थितीवर बारीक नजर ठेवत पाकिस्तानला मुँहतोड जवाब देण्याची शिकस्त करीत असताना देशात अत्यंत सुसंस्कृत भाषेत पंतप्रधान देशवासीयांशी संवाद साधत असताना राहुल गांधी यांनी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन चौकीदार चोर है, चौकीदार डरपोक है, अशी वक्तव्ये करून काँग्रेसच्या स्तुतीपाठक कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळवून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम करणे ही काँग्रेसची संस्कृती! श्शी! काँग्रेसची धुरा वाहिलेल्या मातब्बरांनी आज स्वर्गातही राहुलचं भाषण ऐकून ‘हेचि फल काय मम तपाला’ असं कपाळावर हात मारून घेतला असेल.

राहुल गांधी यांनी, ‘नफरतसे नहीं प्यारसे जीतेंगे’ अशी भली मोठी हाळी दिली आणि मग त्यांच्या बगलबच्च्यांनी त्याची मोठमोठाली होर्डिंग्ज लावून स्वतःची वारेमाप प्रसिद्धी करून घेतली. ‘नफरतसे नही, प्यार से जीतेंगे’ असा संदेश एकीकडे देणार्‍या आणि शब्दांची लाखोली वाहून आपले हिडीस प्रदर्शन घडवणार्‍या राहुल गांधी यांचे धुळे-मुंबईतील भाषण ऐकताना निष्ठावंत काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांचे चेहरे पडले असल्यास नवल नाही. 1971 च्या बांगलादेश निर्मितीच्या वेळी इंदिरा गांधी यांना अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘दुर्गा’ची उपमा दिली आणि आज 56 इंचाची छाती जगासमोर अभिमानानं दाखविणार्‍या शांतीचा पुरस्कार घेणार्‍या आणि पाकिस्तानचं नाक मुठीत पकडून त्याला जेरीस आणणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चौकीदार चोर है, चौकीदार डरपोक है अशा शब्दात इंदिराजींचा नातू जेव्हा बोलतो तेव्हा संस्कृतीने समृद्ध असलेला भारत आणि त्या अलौकीक ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या देशाचा स्वाभिमानी नागरिक हेच का तुमचे प्रेम? असा सवाल मतपेटीसमोर आल्यावर निश्चित केल्याशिवाय राहणार नाही.

एकीकडे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुशलरीतीने परिस्थिती हाताळत असताना त्यांना समर्थपणे साथ देण्याचे सोडून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धडपडणार्‍या सत्तेसाठी हापापलेल्या राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह जाणत्या राजांना देशातील जनता चोख जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे पाकिस्तानबरोबरचा प्रश्न निकालात निघाल्यानंतर राजकीय बोलू, असे सांगणार्‍या राहुल गांधी यांनी ‘उतावळा नवरा आणि गुडघ्यास बाशिंग’ अशी आपली अवस्था करावी, तसेच ‘नफरतसे नही, प्यारसे जीतेंगे’ म्हणत म्हणत घटनेने निवडलेल्या, निवडून आलेल्या आणि संविधानात्मक जबाबदारी चोखपणे पार पाडणार्‍या पंतप्रधानांना भरसभेत वाट्टेल तशा शिव्या घालणे हेच का तुमचे प्रेम? हेच जर तुमचे प्रेम असेल तर मग नफरत कशी? वाघा बॉर्डरवर पाकिस्तानातून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान एका विजयी योद्ध्यासारखा येत असताना आणि 125 कोटी भारतवासी त्याचे हर्षोल्हासात स्वागत करण्यासाठी आसूसलेले असताना मुंबईच्या झोपडपट्टीवासीयांना 500 चौरस फुटाचं घर देण्याचं गाजर दाखवीत पंतप्रधानांना शिव्या घालणारे केवळ सत्ता मिळविण्यासाठी हापापलेले राहुल गांधी देशाने पाहिले आणि स्वाभिमानी, राष्ट्रप्रेमी नागरिकांचा चेहरा संतापाने फणफणलेला दिसत होता.

अरे, लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची धुळे-वांद्य्रातील सभा राहुल गांधींनी आठवडाभर पुढे ढकलली असती तर काय झाले असते? अर्थात काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्तेही मनोमन हाच विचार करीत होते. आज काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष जरी असला, तरी त्या पक्षाची ‘निर्णायकी’ अवस्था झाल्यासारखे दिसून येते. कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. ज्याच्या हाती नेतृत्व आहे तो इतरांना विचारात, जुमानत नाही. जो काम करू इच्छितो त्याला काम नाही आणि पक्षातील असंतोष दूर करण्याची कुणामध्ये धमक नाही. सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या पक्षाचे नेतृत्व ज्याचा एकही आमदार-खासदार नाही अशांसमोर गुडघे टेकायला तयार झालेत. ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था पाहायला मिळतेय. पक्षातील माजी पदाधिकार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व नाही, अशीच चर्चा ऐकायला मिळते. असंच जर चालत राहिलं आणि 55 वर्षे भारतावर अधिराज्य गाजविणार्‍या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अजूनही तीच तीच आश्वासने द्यावी लागतात. म्हणूनच अशा वेळी महात्मा गांधी यांनी 1948 साली काँग्रेस विसर्जित करण्याची व्यक्त केलेली इच्छा भारतातला सुजाण नागरिक 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.

Check Also

सत्ता कुणाची?

विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये प्रचारात भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा होता. त्याखालोखाल …

Leave a Reply