Breaking News

गो कार्ट कार

विज्ञानाने मनुष्याच्या पंखात बळ आणले आहे. या बळावर मानव  नवनवीन शोध लावत आहे. मानवाच्या जीवनात उत्क्रांती करण्यात शास्त्रज्ञांचा मोठा हात आहे. हे संशोधक लहान वयातच, आपले गुण जगासमोर आणतात. त्याला आकार देण्याचे काम शालेय जीवनात गुरुजन करीत असतात.   शालेय व महाविद्यालयात तालुका, तसेच जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवली जातात. या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना  शिक्षण घेत असलेल्या विषायांच्या व्यतिरिक्त स्वतःच्या कला गुणांना वाव मिळावा, तसेच आपल्यातील सुप्त असणारी वैज्ञानिक शक्ती  प्रत्यक्षात कृतीत येत साकार व्हावी हायामागचा हेतू असतो. शालेय जीवनात देशात अनेक शास्त्रज्ञ जन्मास आले आहेत, बालमनात वैज्ञानिक शक्ती जागृत  झाल्यानेच विज्ञानाने प्रगती केली आहे. भारत देश वैज्ञानिक जगाचे माहेरघर आहे. या देशात अनेक वैज्ञानिक निर्माण झाल्याने भारताने जगावर एक प्रकारचा आदरयुक्त दरारा निर्माण केला आहे.

डॉक्टर होमी भाभा, माजी राष्ट्रपती डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम, अंतराळ कन्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स असे अनेक सुपुत्र भारतमातेच्या मातीतून आले. जगात हिंदुस्तानच्या तिरंग्याची शान वाढत आहे. हे वैज्ञानिक ज्ञान बालपणापासूनच शालेय जीवनात भारतमातेच्या या सुपुत्रांमध्ये असल्याने देशाने आज सर्वच क्षेत्रात प्रगती केली. तशीच प्रगती विज्ञान क्षेत्रातही उच्च स्थानावर आहे, तसेच शालेय व महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असताना सांस्कृतिक, क्रीडा, व्याख्यानमाला, वैज्ञानिक प्रदर्शन भरविली जातात. या कार्यक्रमातून अनेक नवनवीन संशोधन, तसेच खेळाडू, विचारवंत, कलाकार यांची पारख होऊन अनेक सुपुत्रांचा उदय झाला आहे.

कमी वजनाच्या कमी  किमतीच्या मात्र सुसाट वेगाच्या कार सध्या स्पर्धात्मक जीवनात मोलाची भूमिका बजावत आहेत. पंढरपुरात मागील कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशविदेशातून ऐकून 14 संघ सामील झाले होते. अगदी रवांडा आफ्रिका येथील संघाने सहभाग घेतला होता. 41 संघांपैकी 14 चा संघ या स्पर्धेस पात्र ठरले होते. आंतरराष्ट्रीय सोलर कार स्पर्धेसाठी सोलर कारची तांत्रिक तपासणी वेग व नियंत्रण व सोलर राऊंड अशा 3 स्पर्धा घेण्यात आल्या. केवळ 160 ते 350 किलो वजनाच्या 350 वॅट क्षमतेचे सोलर प्यानल बसविलेल्या सोलर कारचे वजन नियंत्रित ठेवले होते. सौरउर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे हा या स्पर्धेचा उद्देश होता. एकीकडे पारंपरिक ऊर्जेचा भरमसाठ होणारा वापर थांबवीत, निसर्गाने दिलेल्या अपारंपरिक स्त्रोताचा अधिक वापर वाढवून प्रदूषण मुक्तीचा संदेश समाजाला देण्याची प्रेरणा मिळावी हा हेतू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतून साध्य केला आहे.

खालापुरातील रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुचाकीचे इंजिन वापरून बनविली गो-कार्ट कार सध्या महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे, त्यांच्या इंजिनीअरिंग, मेकॅनिक, वैज्ञानिक कलागुणांचे प्रात्यक्षिक ही गो कार्ट कार आहे. इंजिनिअरिंगच्या मुलांना नवनवीन प्रोजेक्ट सदर करून त्यांच्या प्रयोगशीलतेचा   विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अगदी काही क्षणात अतिवेगात धावणारी  ही कार वेगाच्या दुनियेत एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित पिल्लई एचओसीमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी गो-कार्ट या कमीत कमी वजनाच्या कारची निर्मिती केली आहे. कार बनविण्यासाठी दुचाकीचे इंजिन वापरले आहे. महाविद्यालयातील मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल विभागाच्या 25 विद्यार्थ्यांनी आर वन फाय या दुचाकीचे इंजिन वापरून कमीत कमी वजन ठेवून गो कार्ट कारची निर्मिती केली आहे. गो-कार्ट कार वेगाने रस्त्यावर धावू शकते. या कारचे प्रात्यक्षिक महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी करून दाखविले.

प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने  विद्यार्थ्यांची गर्दी जमली होती… पिल्लई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली ही कार जिआरडीसी स्पर्धेत उतरणार आहे. ही स्पर्धा दिल्ली नोयडा येथे होणार आहे. आकाराने लहान असणारी ही कार वेगाने धावू शकते. कमी इंधनावर चालणारी गो कार्ट कार लीलया स्पर्धा पूर्ण करू शकते.  सदर कार बनविण्यासाठी पिल्लई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन सहकार्य केले. संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. निवेदिता श्रेयांश, उपसचिव डॉ. लता मेनन या वेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. ही कार बनविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य मधुमिता चॅटर्जी, मेकॅनिकल ऑटोमोबाईल विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. पाटील, प्राध्यापक डॉ. एम. बी. नाडार आणि वैभव भगत आदींचे मार्गदर्शन लाभले.

यापूर्वी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेल्या या कारने नवी मुंबईतील स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविला आहे. आता दिल्ली येथे आयएसएनईई या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत उतरणार आहे, असे सांगण्यात आले आहे. गो कार्ट कार निमण करण्यासाठी तब्बल आठ महिन्यांची मेहनत व कल्पक बुद्धीचा चातुर्याने विद्यार्थ्यांनी वापर केला आहे.

गो कार्ट कार बनविण्यासाठी 1 महिन्याचा अवधी लागला आहे. ही वेगाने धावू शकते, कारमध्ये स्टेअरिंगचा वापर अगदी कलात्मक दृष्टीने करण्यात आला आहे. अजिंक्य शेवले, निशांत नाईक व गणेश बलेगरे यांच्यासह महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांच्या टीमने या कारच्या निर्मितीसाठी, तसेच स्पर्धेत टिकण्यासाठी अथक प्रयत्न, मेहनत घेतली आहे. आकाराने लहान असलेल्या या कारची खरी कसोटी नोएडा येथे होणार्‍या कार स्पर्धेत पाहावयास मिळणार आहे. स्पर्धेत पिल्लई महाविद्यालय रसायनी यांनी बनवलेली गो कार्ट कार पहिली आल्यास खालापूर रायगडसह महाराष्ट्राचेही नाव देशात उंचावेल, तर पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालय रसायनी यांचीही शान वाढणार आहे.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply